राणेंमुळे खारेपाटण दशक्रोशीत मुलांना शिक्षण..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 30, 2024 05:39 AM
views 100  views

कणकवली : 2012 साली खारेपाटण येथे उच्च शिक्षणासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे  खारेपाटण दशक्रोशीतील मुले बारावी उत्तीर्ण झाली की पुढील शिक्षणासाठी कणकवली, राजापूर किंवा मुंबई यासारख्या ठिकाणी जात होते. विद्यार्थिनींचे तर शिक्षणच थांबत होते.  विद्यार्थी, विद्यार्थिनींची ही अडचण ओळखून खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, संस्थेचे संचालक कै. बबन धुमाळे आणि संस्थेचे  खजिनदार मोहन (भांजा) कावळे यांनी आपल्या बारावीपर्यंतच्या कॉलेजलाच सीनियर कॉलेज सुरू करायचा निश्चय केला. यावेळी या कॉलेजला मान्यता मिळवणे म्हणजे खूप जिकरीचे काम होते. परंतु यांनी राणे यांच्याकडे जायचे ठरविले. यावेळी अनेकांचे विरोध ही पत्करावे लागले. 

परंतु हार न मानता या तिघांनी मा.राणे साहेबांच्या जुहू येथील  बंगल्यावर जाऊन राणे यांची भेट घेतली. त्यावेळी राणेसाहेबांनी त्यांची विचारपूस करत, काय काम आहे आणि मी काय करू शकतो याची विचारणा केली. यावेळी त्यांनी येथील मुलांचे होणारे हाल तसेच मुलींचे थांबणारे उच्च शिक्षण याबाबत  खंत राणे साहेबांकडे व्यक्त केली. लागलीच राणेसाहेबांनी त्यावेळचे शिक्षण मंत्री टोपे साहेब यांच्याशी  फोनवरून संपर्क करून आमची माणसे पाठवत आहे त्यांचे काम करा असे सांगितले. त्याप्रमाणे या तिघांनी मंत्रालय गाठले आणि तेथे जाऊन आम्ही सिंधुदुर्गातून आलो आहोत असे सांगितले.

दादांची माणसे म्हटल्यावर लागलीच त्यांना आत घेऊन चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि शिक्षण मंत्री  टोपे साहेब यांच्या केबिन मध्ये पाठविण्यात आले. टोपे साहेबांनी देखील कुठलाही विचार न करता  दादांची कोकणातील माणसे आली म्हटल्यावर लागलीच  सही करून मंजुरी दिली. 

त्याप्रमाणे 3 जुलै 2012 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाचे सीनियर कॉलेज खारेपाटण येथे सुरू करण्यात आले. प्रवेशाचा कालावधी निघून गेला तरी देखील खजिनदार मोहन (भांजा) कावळे यांनी याच दिवशी कॉलेज सुरू करायचं निश्चित केल्यामुळे लागलीच दशक्रोशीतील सुमारे 92 विद्यार्थिनींना तेरावी मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला.

 आज या कॉलेजमध्ये दशक्रोशीतील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत आणि आतापर्यंत अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन पुढे गेले आहेत. यामध्ये या महाविद्यालयाचे प्राचार्य ए.डी. कांबळे सर यांनी गेली बारा वर्ष एकही रुपया मोबदला न घेता आपले ज्ञानदानाचे काम चालू ठेवले आहे.तसेच इतर शिक्षक वर्ग आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ आपापल्या परीने संस्थेला वेगवेगळ्या रूपाने हातभार लावत आहेत.

नारायण  राणे  शिफारशीमुळे आज दशक्रोशीतील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींना या कॉलेजचा उच्चशिक्षणाचा लाभ घेता आला आहे. असे माजी विद्यार्थी संतोष धुरत शेठ न.म.विद्यालय,खारेपाटण यांनी सांगितले आहे.