प्रशासनाचे सहकार्य नसल्याने पर्ससीन विरुध्द पारंपारिक मच्छिमार यांच्यात संघर्ष

दांडीत पारंपारिक मच्छिमारांची बैठक
Edited by:
Published on: October 30, 2023 20:08 PM
views 233  views

मालवण : गेली बारा ते तेरा वर्षे पारंपारिक मच्छिमार पर्ससिननेट विरोधी लढा देत आहेत. पण प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने पर्ससीन विरुध्द पारंपारिक मच्छिमार यांच्यात संघर्ष पेटत आहे. जोपर्यत शासन आणि प्रशासन समुद्रातील अनधिकृत पर्ससिन नौकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही शासनाला सहकार्य करणार नाही असा एकमुखी निर्णय आज दांडी येथील पारंपारिक मच्छिमारांच्या बैठकीत घेण्यात आला.

तळाशील समुद्रात दोन पर्ससीन नौकांवर तळाशील मधील पारंपारिक मच्छिमारांनी काल हल्ला चढवीत नौकांवरील खलाशांना मारहाण केल्याची घटना घडली होती. गेली काही वर्षे पर्ससीन विरोधात पारंपारिक मच्छिमारांच्या सुरु असलेल्या संघर्षाला नव्याने तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर आज दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात पारंपारिक मच्छिमारांची बैठक झाली. यावेळी मच्छिमार नेते दिलीप घारे, मिथुन मालंडकर, रविकिरण तोरसकर, बाबी जोगी, सन्मेष परब, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, तळाशील येथील संजय केळूसकर यांसह शेकडो पारंपरिक मच्छिमार उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पर्ससीन नौकांद्वारे मासेमारी होत असताना मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. मत्स्य व्यवसाय विभागातील अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. पर्ससीनला पारंपारिक मच्छिमारांचा विरोध कायम असून कोरोना काळात थांबलेला आमचा लढा आता पुन्हा सुरु झाला आहे.  पर्ससीन विरोधातील लढा आणखी तीव्र करणार, असा इशारा मच्छिमारांनी दिला.

मत्स्य विभाग हा मच्छीमारांसाठी असताना पारंपारिक मच्छिमारांनी वारंवार लक्ष वेधूनही मत्स्य अधिकारी अनधिकृत मासेमारीवर कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे आपली पारंपारिक मच्छिमारी आपणच टिकवली पाहिजे. आपल्या सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी होता नये, यासाठी सर्व पारंपरिक मच्छिमारांनी पर्ससीनला विरोध कायम ठेवावा. मत्स्य विभाग भांडवलदार पर्ससीन मच्छिमारांना अभय देत आहे. मत्स्य विभाग व शासन आपल्यास सहकार्य करत नसेल तर प्रसंगी पारंपारिक मच्छिमारांनीही शासनाशी असहकाराची भूमिका घ्यावी असे मच्छिमारांनी सांगितले. 

अन्वय प्रभू म्हणाले, मच्छिमारांच्या संघर्षात राजकीय लोकप्रतिनिधी केवळ मच्छिमारांना पाचारायला येतात. त्यापेक्षा पारंपारिक मासेमारीला घातक ठरणारी पर्ससीन मासेमारी हद्दपार करण्याची हिंमत लोकप्रतिनिधीनी दाखवावी. लोकप्रतिनिधीनी जबाबदारी घेऊन पर्ससीन नौका घालवून दाखवाव्यात, यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीच्या पाठीशी राहू. यावेळी रविकिरण तोरसकर म्हणाले, पारंपरिक मच्छिमारांची भूमिका आपण सातत्याने भाजप पक्ष व प्रशासनाकडे मांडत आहोत. आज तळाशील समुद्रातील घटनेमुळे पर्ससीन विरोधातील पारंपरिक मच्छिमारांचा लढा पुन्हा सुरु झाला आहे. हा लढा विस्कळीत होता कामा नये.

तळाशील समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर तळाशील येथील पारंपरिक मच्छिमारांनी केलेला हल्ला ही आमच्या संघर्षाची नांदी आहे. तळाशील मधील मच्छिमारांचा पर्ससीनला विरोधच आहे. मात्र आम्हाला धमक्या देणाऱ्यांनी पारंपरिक मच्छिमारांना हात लावून दाखवावा. कालच्या संघर्षापेक्षा यापुढचा संघर्ष अधिक तीव्र होईल असा इशारा तळाशील येथील संजय केळूसकर यांनी दिला. तसेच तळाशील मधील काही पारंपारिक मच्छिमार आता पर्ससीन मासेमारी करत आहेत. त्यांनी आमच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे, मात्र पर्ससीन मासेमारी करून पाठिंबा देणाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा नको अशी भूमिकाही संजय केळूसकर व इतर मच्छिमारांनी यावेळी मांडली.