
वेंगुर्ले : गेले काही दिवस पडणा-या मुसळधार पावसाने राहत्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे पडल्याने नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. २२ जुलैपर्यंत एकूण सुमारे ५ लाख ८ हजार रुपयांच्या नुकसानाची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे. तालुक्यात गेल्या २४ तासात ७२ मि.मी.पाऊस पडला असून एकूण १७६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. आता पाऊस जरी कमी प्रमाणात सुरू असला तरी नद्या, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत.
गेले काही दिवस पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आसोली येथील शंकर सोमा नाईक यांच्या मांगरावर झाड पडून १४ हजार ५०० रुपये नुकसान, जोसोली येथील सद्गुरु श्रीधर गावडे यांच्या घरावर झाड पडून १९ हजार रुपयांचे नुकसान, तुळस येथील चंद्रकांत आत्माराम सावंत यांच्या घरावर झाड पडून ६ हजार ४०० रुपयांचे नुकसान, वजराठ-वरचीआड येथील गणपत धोंडू सावंत यांच्या घरावर झाड पडून ८ हजार ५०० रुपयांचे नुकसान, तुळस येथील अपूर्वा नारायण दामले यांच्या घराची भिंत व वासे मोडून ४७ हजार ५०० रुपयांचे नुकसान, वायंगणी येथील बाळकृष्ण रेवणकर यांच्या घराचे छप्पर पडून ५२ हजारांचे नुकसान, तुळस-खराटवाडी येथील वसंत शांताराम घारे यांच्या मांगराची पडवी पडून वासे, रिप, कौलाचे धरुन एकूण २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान, मठ येथील संतोष साबाजी धुरी यांचा शेतमांगर पडून ३६ हजार ५०० रुपयांचे नुकसान, मठ येथील संतोष विश्वंभर मठकर यांच्या घराची मातीची भित कोसळून २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान, वेंगुर्ला शहरातील अशोक यशवंत वेंगुर्लेकर यांच्या घरानजिकचा संरक्षित कठडा पडून नुकसान, वेंगुर्ला येथील चंद्रकांत भिकाजी रायकर यांचे मातीचे धर पडून १ लाख ६ हजार ५०० रुपयांचे नुकसान, वेतोरे-पालकरवाडी येथील विजय बाबाजी पालकर यांचे पक्के घर अंशतः पडून अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान, शिरोडा परबवाडा येथील संदीप मोहन परब यांच्या मातीच्या घरावर झाड पडल्याने ३८ हजारांचे तर त्यांच्याच लागत्या माडाचे व निर फणसाचे झाड मुळासकट उपटून पडल्याने सुमारे ३० हजारांचे नुकसान, वेतोरे येथील मंगला बाळा तळकर यांच्या घरावर झाड पडून १९ हजारांचे नुकसान, वेंगुर्ला येथील महादेव भिवा सरमळकर यांचा मातीचा मांगर पडून अंदाजे ५६ हजारांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान गुरुवारी २० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात तुळस-पलतड ते मातोंड पर्यंत असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याच्या साईडपट्टीची माती पुराच्या पाण्याने वाहून जाऊन खड्डा पडल्याने शेजारी असलेल्या भात शेतीचे नुकसान झाले. आज २२ जुलै रोजी पावसाने काही क्षण विश्रांती घेतली असली तरी नदी, ओहोळ हे तुडुंब भरुन वाहत आहेत. तर तालुक्यात मोठ्याप्रमाणात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.