दोडामार्ग तालुका नारायण राणे यांच्यामुळेच

संजय गवस, अज्ञान प्रकट करू नका | सुधीर दळवी यांचा पलटवार
Edited by: संदीप देसाई
Published on: April 15, 2023 18:05 PM
views 120  views

दोडामार्ग : नारायण राणेंवर टीका करणा-या संजय गवस यांनी बालिशपणा दाखवून आपल अज्ञान प्रकट करू नये. राणेंवर टीका करण्याइतपत गवस यांची उंची तरी आहे का? दोडामार्ग तालुक्याची निर्मिती राणेंनी केली, आडाळी एम आय डी सी अवघ्या तीन महिन्यामध्ये राणे यांनी मंजूर केली. दोडामार्ग तालुक्याला विकास प्रक्रियेत गती देण्याचं काम ख-या अर्थानं राणेंनी  केलेले आहे, त्यांच राणे यांच्यावर टीका करण्याचा बालिशपणा संजय गवस करत असल्याने हा  उंटावरून शेळी हाकण्याचा प्रकार आहे, असे प्रत्युत्तर भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिलंय.


त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, केंद्रीय मंत्री राणे यांनी आडाळी एम आय डी सी मंजूर केली. पण त्याठिकाणी उद्योगधंदे तसेच  विकसित होऊ नये म्हणून तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विशेष प्रयत्न केले. हे संजय गवस यांनी विसरू नये. तुम्ही सत्तेत होता त्यावेळी का प्रयत्न केले नाही. मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत हे तुमच्या पक्षाचे मंत्री होते, त्यावेळी त्यांची तळी उचलण्याचे काम संजय गवस करीत होते. त्यावेळी त्यांना आडाळी एम आय डी सी चा विकास करणे जमलं नाही.  त्यांनी उगाच विकासाचा गवगवा करू नये. राणेंना श्रेय जाईल, या कुटील महत्वकांक्षेपायी आडाळी एमआयडीसी विकसित केली नाही. तर आडाळी एमआयडीसी मध्ये आयुर्वेदीक संशोधन केंद्र मंजूर व्हावं, या साठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी खास बाब म्हणून आडाळी एमआयडीसी मध्ये व्हावं, असे महाराष्ट्र सरकारला कळवले, तरीपण त्यावेळेच्या उदयोग मंत्री सुभाष देसाईना वाटलं नाही, ते आडाळीत व्हावे, असे तर त्याच्यात सरकारमध्ये असलेले मंत्री देशमुख आपल्या जिल्ह्यात नेत होते. हा कुटील डाव सुद्धा आमच्या नेत्यांनी हाणून पाडला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पुनःश्च पत्र दिले कि हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच झाला पाहिजे. सिंधुदुर्ग ऐवजी जर हा प्रकल्प अन्य ठिकाणी गेला तर प्रकल्प रद्द करण्यात येईल. आणि त्यामुळे नाइलाजस्तव आडाळी एमआयडीसी मध्ये जागा देणे उद्धव सरकारला भाग पाडले. आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्याची धमक केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातच आहे. त्यामुळे ना घर का ना घाट का अशी केविलवाणी परिस्थिती झालेल्या उद्धव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस यांनी आपले अज्ञान प्रकट करून बालिशपणा दाखवू नये. यापुढे जर आमच्या नेत्यावर टीका झाल्यास सजय गवस यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे आव्हान सुधीर दळवी यांनी दिले आहे.