
सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क लाभ देण्याच्या तरतूदीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या खऱ्या 24 वारसांना वारसा हक्क लाभ देताना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेतले आहे. दिनांक एक मे 2026 रोजी जागतिक कामगार दिन महाराष्ट्र दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्या मुहूर्तावर पालकमंत्र्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या खऱ्या खुऱ्या 24 वारसांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेत नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा इतर जिल्हातील नागरिकांसाठी नेहमीच "भरती केंद्र बनला आहे" असे आजपर्यंतचे विदारक चित्र असताना "लाड-पागे" शासन निर्णयाच्या आधारावर माझ्या जिल्ह्यातील नागरिक जिल्हा परिषद सेवेत भरती झाले हे मनाला अतीव आनंददायी आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भरती झालेले सफाई कामगारांचे बोगस वारस, त्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात मांडलेल्या भूमिकेनंतर एका विशिष्ट समाजासाठी असलेला शासन निर्णय सर्व जाती धर्मातील सफाई कामगारांना लागू करण्याचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्ण निर्णयामुळेच घाणीत काम करणारे कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांचे सह संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल समस्त सिंधुदुर्ग जिल्हा वासियांतर्फे शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत जाहीर त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या शिवाय जिल्हा परिषदेतील कार्यरत इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडेही जिल्हा परिषद प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती श्री. गावडेंनी दिली आहे.










