LIVE UPDATES

रायगडमध्ये थरारक रेस्क्यू

२५० फूट खोल दरीत कंटेनर कोसळला; ५ तासांच्या थरारानंतर चालकाची सुखरूप सुटका
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 11:42 AM
views 49  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news#raygad

रायगड : पुणे–कोलाड मार्गावरील पहुर फाटा ते वाळंजवाडी दरम्यान मालवाहू कंटेनर तब्बल २५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका करण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरमध्ये चालक आणि क्लीनर असे दोघेजण होते. कंटेनर दरीत कोसळल्यानंतर क्लीनर किरकोळ दुखापतींसह बाहेर पडला. मात्र चालक कंटेनरमध्ये अडकून गंभीर अवस्थेत होता.

कंटेनर एका झाडाच्या आधारावर धोकादायक स्थितीत अडकला होता. त्यामुळे बचावकार्य करताना रेस्क्यू टीमसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही बचाव पथकाने अथक प्रयत्न सुरू ठेवले.

तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाला कंटेनरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या बचावकार्यात SVRSS Rescue Team, एरुणकर क्रेन सर्व्हिस कोलाड आणि कोलाड पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम केले.या थरारक बचावकार्यात रेस्क्यू टीमने दाखवलेल्या धाडसामुळे चालकाचे प्राण वाचवण्यात यश आले. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.