
सावंतवाडी : वेश्याव्यवसायाच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारे दोन अंकी मराठी नाटक 'बायना का आयना' २४ मे रोजी सावंतवाडीत तर २५ मे रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. सिमेन्स सांस्कृतिक संस्थेने या नाटकाची निर्मिती केलेली असून नाटकाचे संहिता लेखन व दिग्दर्शन महेश सावंत पटेल यांनी केले आहे. या नाट्याच्या संहितेला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्गातील जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डाॅ.रुपेश पाटकर यांच्या 'अर्ज मधील दिवस' या पुस्तकावर हे नाटक आधारित आहे. गोव्यातील बायना या एकेकाळच्या रेडलाईट वस्तीत मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेले अनुभव डाॅ. पाटकर यांनी सदर पुस्तकात अधोरेखित केले आहेत. वेश्याव्यवसायबाबत असलेल्या गैरसमजांना हे नाटक दूर करत प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावते.
८० ते ९० वेळा मी ते पुस्तक वाचले
'जेव्हा मी डॉ. रुपेश पाटकर यांचे पुस्तक वाचले तेव्हा मला लैंगिक छळाला बळी पडलेल्या स्त्रियांच्या विश्वाची ओळख झाली. त्यानंतर मी डॉक्टरांशी त्यासंबंधी चर्चाही केली. त्यांचे ते पुस्तक मी दोन वर्षे पुन्हा पुन्हा वाचून काढत होतो. अशा स्त्रियांच्या आयुष्यात आलेल्या घटना आपल्याला माहिती असतात, काही आपण वाचलेल्या असतात, आपल्या मनात त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज असतात पण वस्तुस्थिती अनेकदा वेगळी असते. डॉक्टरांचे हे पुस्तक वाचल्यावर मला वाटले की त्यावर नाटक लिहावे व दिग्दर्शित करावे. यापूर्वी मी नाटके तसेच सिनेमा देखील दिग्दर्शित केले आहेत. व्यावसायिक नाटकांमधून देखील मी काम केले आहे. त्यामुळे या पुस्तकावर एक चांगले नाटक बनू शकते असा माझा विश्वास होता. जवळजवळ ८० ते ९० वेळा मी ते पुस्तक वाचले आहे. त्यातून अनेक प्रसंग मनात तयार झाले असल्याचं दिग्दर्शक महेश सावंत पटेल यांनी सांगितलं.