
दोडामार्ग : भाजपच्या सेवा पंधरवडा २०२५ या उपक्रमाच्या औचित्याने, दोडामार्ग तालुक्यात अबालवृद्धांच्या आरोग्याची निःस्वार्थी काळजी घेणारे डॉ. उमेश देसाई यांचा त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय कार्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
दोडामार्गसारख्या ग्रामीण तालुक्यात वैद्यकीय सुविधांचा मोठा अभाव असतानाही डॉ. देसाई गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रुग्णसेवेत कार्यरत आहेत. शांत, संयमी स्वभाव, समजूतदारपणा आणि विश्वासार्ह उपचार पद्धती यामुळे ते स्थानिकांमध्ये ‘आरोग्यदेवदूत’ म्हणून ते ओळखले जातात. विशेषतः नवजात शिशु आणि लहान मुलांवरील आजारांवर त्यांच्या उपचारांमुळे असंख्य पालकांना दिलासा मिळतोय.
पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत त्यांच्या दवाखान्यात रुग्णांची रांग लागलेली दिसते. तालुक्यात फारच मर्यादित शासकीय वैद्यकीय यंत्रणा आणि खाजगी रुग्णालयांची कमतरता असल्याने आपत्कालीन प्रसंगी नागरिक डॉ. देसाई यांच्या दवाखान्यासह थेट त्यांच्या निवासस्थानीही धाव घेतात. कोणतेही कारण न देता, विनम्रतेने रुग्णांची सेवा करणे हेच त्यांचे वैशिष्ट्य बनले आहे.
डॉ. देसाई यांच्या या अखंड आणि निस्वार्थ सेवेसाठीच सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत त्यांचा विशेष सत्कार झाला. या वेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी “डॉ. देसाई यांची समाजासाठीची सेवाभावी वृत्ती प्रेरणादायी आहे. अशी सेवा सतत चालू राहावी,” अशा शब्दांत सदिच्छा व्यक्त केल्या.
उपस्थित नागरिक, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आयोजकांचे अभिनंदन करत “योग्य व्यक्तीचा सन्मान झाल्याने झाल्याची भावना व्यक्त केली. दोडामार्ग वासीयांतूनही डॉ. देसाई यांच्या या गौरवाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.










