डॉ. पाटकर यांच्या 'संस्कार संचित'चे गायक अजित कडकडे यांनी केलं कौतुक

Edited by: भगवान शेलटे
Published on: August 08, 2023 13:20 PM
views 143  views

सावंतवाडी : संस्कार संचितमधून डॉ.रुपेश पाटकर यांनी गीतेच्या तत्वज्ञानावर आधारित ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अंतःकरणाला भिडणाऱ्या आहेत. यातील एकेका गोष्टीचे पारायण करायला हवे, असे उद्गार प्रसिद्ध मराठी गायक अजित कडकडे यांनी काढले.

  मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या संस्कार संचित या पुस्तकाचे प्रकाशन गोवा-दिवाडी येथे अजित कडकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आडाळी सरपंच पराग गावकर, पत्रकार राजेश मोंडकर, कोकणसाद LIVEचे सब एडिटर भगवान शेलटे उपस्थित होते. संस्कार संचित हे गीतेच्या अठरा अध्यायावर आधारित गोष्टीरूप पुस्तक आहे. या पुस्तकाला डॉ. भा. वा. आठवले यांची प्रस्तावना आहे.

 अजित कडकडे म्हणाले, या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट बोधपर असून मी त्या सलग वाचत गेलो. यातील प्रत्येक गोष्ट अंतःकरणाला भावली. यात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीनुसार आपण आचरण केले तर परिवर्तन घडेल. पण कादंबरीसारखे वाचन न करता, एकेक गोष्ट पुन्हा वाचायची. तिचे पारायण करायचे. गीतेच्या  तत्वज्ञानावर आधारित ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अंतःकरणात रुजल्या पाहिजेत. हे पुस्तक छोटे असले  तरी आशय मोठा आहे. मराठी साहित्यातील हा खूप मोठा ठेवा असून तो इतरांनाही दिला पाहिजे.

 यावेळी डॉ. पाटकर यांनी आपल्या पुस्तकाच्या निर्मितीविषयी माहिती कडकडे यांना दिली. कडकडे यांनी लेखनाच्या माध्यमातून डॉ. पाटकर हे करत असलेल्या समाज प्रबोधनाविषयी कौतुक करत शुभेचछा दिल्या.