डॉ. सविता दाभाडे यांना आदर्श पुरस्कार प्रदान

Edited by: मनोज पवार
Published on: September 30, 2025 12:43 PM
views 114  views

चिपळूण  : चिपळूण येथील सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. सौ. सविता दाभाडे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “आदर्श पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पुणे येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य आणि देखण्या सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार दरवर्षी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांतील गुणवंत कार्यकर्त्यांची निवड करून दिला जातो. शिक्षण, वैद्यकीय, पर्यावरण, पर्यटन आणि सामाजिक कार्य या विभागांतील कार्यगौरव म्हणून “आदर्श पुरस्कार” दिला जातो.

यावर्षी डॉ. दाभाडे यांची निवड त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्यामुळे करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप मेडल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

डॉ. सविता दाभाडे या ‘ॐ कार दातांचा दवाखाना’, चिपळूण या अत्याधुनिक दंत चिकित्सालयाच्या संचालिका आहेत. त्या गेली अनेक वर्षे कोकणातील नागरिकांना दर्जेदार आणि वेदनारहित दंत उपचार देत आहेत. कोविड काळातही त्यांनी अविरत सेवा दिली. तसेच, २०२१ मधील चिपळूण परिसरातील महापुरानंतर त्यांनी संपूर्ण एक महिना मोफत दंत तपासणी आणि अत्यल्प दरात उपचार केले.

शाळा, महाविद्यालयांमध्ये दंत आरोग्यावर व्याख्याने आणि मोफत तपासणी शिबिरे, तसेच दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’ सारख्या उपक्रमांद्वारे त्या जनजागृती करत असतात.

सामाजिक बांधिलकी जपत त्या लायन्स क्लब ऑफ चिपळूण गेलेक्सी च्या माध्यमातूनही सक्रिय कार्य करीत आहेत. सध्या त्या क्लबच्या सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेत “आदर्श पुरस्कार” प्रदान करण्यात आल्यानंतर चिपळूण व संपूर्ण कोकण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.