
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरण उपक्रमाला एक सशक्त पाठिंबा देत, शाळेचे माजी पालक आणि समाजसेवक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी १,५१,१११ रुपयांचा धनादेश शाळेच्या विकासासाठी सुपूर्द केला आहे. यावेळी शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, संस्था कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, डॉ. राजेंद्र चव्हाण, सौ. मालन चव्हाण, मुख्याध्यापक एस. एन. आत्तार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा निधी संस्थेचे सरचिटणीस रघुनाथ चव्हाण यांच्याकडे एका साध्या,पण हृदयस्पर्शी समारंभात सोपवण्यात आला.
डॉ. चव्हाण यांची तिन्ही मुले याच शाळेत शिकली. त्यांच्या आयुष्याची पायाभरणी याच मातीवर झाली. त्या ऋणातूनच त्यांनी हा निधी दिला. डॉ. चव्हाण यांचे शाळेला व संस्थेला प्रत्येक वेळी सहकार्य आणि योगदान असते. त्यांच्या मते, "विद्यार्थ्यांचे केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कारक्षम घडणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे."ही देणगी केवळ आर्थिक मदत नाही, तर ती एक जिव्हाळ्याची ओळख आहे. शाळेबद्दलची नाळ अजूनही घट्ट असल्याचा पुरावा. या योगदानामुळे शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाला चालना मिळेल आणि येणाऱ्या पिढ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळतील. याप्रसंगी डॉ. राजेंद्र चव्हाण आणि सौ.मालन चव्हाण यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या या बहुमोल योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.