
देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामस्थांच्यावतीने डॉ. के. एन.नायसे यांचा सुवर्णसेवा गौरव सत्कारसोहळा उत्साहात संपन्न झाला प्रथितयश डॉ. के. एन. नायसे यांनी मुणगेसारख्या ग्रामीण भागात अतिशय प्रतिकुल व खडतर परिस्थितीत प्रामाणिकपणे रुग्णसेवा बजावली.ज्या काळात दळणवळणाच्या कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या,आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध नव्हती, अशा काळात डॉ.नायसे यांनी मुणगे गावात रुग्णसेवा दिली.
मूळ अकोला येथील डॉ. के. एन. नायसे यांनी १९ ऑक्टोबर, १९७५ साली मुणगे गावात येऊन आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.त्यांच्या वैद्यकीय सेवेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुणगे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सुवर्णसेवा गौरव सत्कार सोहळा श्री देवी भगवती मंदिर येथील रंगमंचावर आयोजित केला होता. यावेळी डॉ.मुणगेकर बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉ. के. एन. नायसे व त्यांच्या पत्नी सौ. शोभा नायसे, श्री देवी भगवती देवस्थान समितीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, मुणगे सरपंच अंजली सावंत, डॉ. गुमास्ते (देवगड), डॉ. सुजीत कदम (मुणगे), डॉ. अविनाश झांटये, डॉ. शिल्पा झांटये, डॉ. अजित लिमये (मालवण), डॉ. अरुण गुमास्ते (देवगड), डॉ. सुनील आठवले (देवगड), डॉ. सतीश लिंगायत, पोयरे सरपंच गीता राणे, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, डॉ. रामदास बोरकर, डॉ. बिले-त्रिंबक, डॉ. भोगटे, विनायक परब, डॉ. सौ. बिले, डॉ. संजय मिसे, डॉ. सचिन पोकळे, डॉ. प्रशांत पोकळे, श्री. केसरकर, लीना भालचंद्र मुणगेकर, डॉ. अमोल चौधरी, डॉ. सुधीर शिवेश्वरकर, सिताराम मुणगेकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने डॉ. नायसे यांचा देवी भगवतीची प्रतिमा, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सुवर्ण सन्मान करण्यात आला. डॉ. नायसे यांच्या पत्नी सौ. शोभा नायसे यांचा सत्कार मुणगे सरपंच अंजली सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
आजकाल रुग्ण दगावला की डॉक्टरांना मारहाण केली जाते. परंतु,येथील जनतेने डॉ. नायसे यांच्या वैद्यकीय उपचारपद्धतीला प्रमाण मानले. जनतेच्या अढळ विश्वासावरच डॉ. नायसे यांनी गावात आपल्या वैद्यकीय सेवेचा सुवर्णकाळ पूर्ण केला. ग्रामीण भागात रुग्णसेवेचे व्रत प्रामाणिकपणे जपणारे डॉ. नायसे हे जनतेसाठी 'देवमाणूसच आहेत,असे मत माजी खासदार तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.सुवर्णसेवा सन्मान' आयुष्यातील सर्वात मोठा सत्कार सत्काराला उत्तर देताना डॉ.नायसे म्हणाले, मी गावात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आलो. या गावामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना वैद्यकीय व्यवसाय करण्याची तयारी केली. गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता, प्रत्येक वाडीमध्ये जाण्यासाठी व्यवस्थित पायवाट किंवा रस्ता नव्हता. वाहतुकीची कुठलीही व्यवस्थानव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत दिवसरात्र पायी चालत 'व्हिजीट करावी लागत असे. माझ्या कुटुंबाने दिलेली साथ व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे गेली ५० वर्षे मी या गावात प्रामाणिकपणे, चिकाटीने वैद्यकीय सेवा दिली. या सेवेबद्दल ग्रामस्थांनी केलेला सुवर्णसेवा सन्मान माझ्या आयुष्यातील मोठा सत्कार आहे. असा सत्कार पुन्हा माझ्या आयुष्यात होईल, असे मला वाटत नाही. या सत्काराबदल मी आपला सदैव ऋणी आहे.
यावेळी निवृत्त प्राध्यापक गौतम मुणगेकर, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक राजेंद्र मुणगेकर, डॉ. सुनील आठवले, डॉ. लिमये, डॉ झांटये, डॉ. लिंगायत, डॉ. सुधीर शिवेश्वरकर, पाणी फाऊंडेशनचे वैभव नायसे, धनंजय नायसे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील पारकर, प्रकाश राणे, संदीप घाडी, हिंदळे पोलीस पाटील संदीप हिंदळेकर, अॅड, नंदू गोरे, रत्नदीप पुजारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक मुणगे शाखाधिकारी अविनाश तळवडेकर आदी उपस्थित होते.प्रास्ताविक देवदत्त पुजारे यांनी केले. सूत्रसंचालन नेहा काणकेकर यांनी केले. आभार बागवे यांनी मानले.










