डॉ. हेमंत कौजलजी आयएमए बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदी

Edited by:
Published on: October 10, 2025 19:15 PM
views 79  views

बेळगाव : प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत कौजलजी यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर डॉ. राघवेंद्र सागर आणि डॉ. केदारेश्वर के. एस. यांची अनुक्रमे सचिव आणि खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा पदग्रहण सोहळा गुरुवारी संध्याकाळी आयएमए हॉल येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. बी. बी. पुट्टी उपस्थित होते.

वैद्यकीय व्यवसायाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यावर भाष्य करताना डॉ. पुट्टी म्हणाले की, सुमारे सात दशकांपूर्वी डॉक्टरांकडे लोक देवदूत म्हणून पाहत असत. छोट्या बॅगमध्ये औषधे आणि गळ्यात स्टेथोस्कोप घेऊन ते निस्वार्थपणे समाजसेवा करत असत. त्या काळी वैद्यकीय क्षेत्रात आजच्या प्रमाणे कॉर्पोरेट संस्कृती नव्हती.

“मात्र आज तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. आज औषधनिर्माण कंपन्या, प्रशासकीय अधिकारी, कायदे निर्माते आणि कॉर्पोरेट्स यांनी आरोग्यसेवा क्षेत्रावर नियंत्रण मिळवले आहे,” असे ते म्हणाले. तरीदेखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित वैयक्तिक उपचार, टेलिमेडिसिनचा शोध, आजारांचे लवकर निदान यांसारख्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचे त्यांनी कौतुक केले आणि तरुण डॉक्टरांचे भविष्य निर्धास्त असल्याचे सांगितले.

याप्रसंगी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना डॉ. कौजलगी यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि संस्थेची सेवा प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि वैद्यकीय नैतिकतेचे पालन करत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गिरीश सोनवलकर, डॉ. संतोष शिंदे तसेच माजी पदाधिकारी उपस्थित होते.