डॉ. चंद्रकांत सावंत यांची आयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मेडलसाठी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: May 17, 2024 10:21 AM
views 362  views

सावंतवाडी : ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक व समाजकार्य क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याची दखल घेऊन त्यांना आयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मेडलने सन्मानित करण्यात आले. डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेल्या दोन दशकात समाज हितासाठी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची आयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड या मेडलसाठी निवड झाली.

पुणे शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या एमआयटी युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर प्रा. महेश थोरवे, पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास दादा पठारे, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्तीताई देसाई, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संस्थेचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. अविनाश धनंजय संकुडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ चंद्रकांत सावंत यानी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ७९ शाळांमधील १३१ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत ४ लाख ७ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १३१ मुलींचा  कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. तसेच डॉ चंद्रकांत सावंत यांनी गेली दोन दशके विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत. आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज डॉ चंद्रकांत सावंत यांनी स्वतः भरून या महिलांना त्यांनी कर्ज मुक्त केले.