देवगड महाविद्यालय इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 15, 2026 17:22 PM
views 88  views

देवगड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज देवगड महाविद्यालयाच्या कौन्सिल सभागृहात सकाळी ८.३० वाजता कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पारस जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पारस जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेतील योगदानाविषयी आपले विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार देश व समाजाला सतत दिशा देणारे आहेत. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांमुळे समाजातील वंचित घटकांच्या विकासाला चालना मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

यानंतर डॉ. संजय तायडे यांनी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. निलेश वानखेडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांवर प्रकाश टाकत भारताच्या जडणघडणीत त्यांच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी राज्यघटनेतील विविध कायदे, तसेच कामगार, महिला व दुर्बल घटकांच्या संरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा धावता आढावा घेत त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश तेली यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रा. राजेश तेली यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.