श्रीराम वाचन मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती!

Edited by: विनायक गावस
Published on: April 15, 2024 13:57 PM
views 47  views

सावंतवाडी : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष  प्रसाद पावसकर यांच्या हस्ते प्रस्तुत समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे, उप कार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा व कर्मचारी वर्ग आणि वाचक उपस्थित होते.

यावेळी डॉ. बुवा यांनी १९३५ मध्ये एका दलिता संदर्भातील खून खटल्या करिता डॉ. आंबेडकर उपस्थित असल्याची घटना विषद केली. माडखोल येथील श्री. वराडकर या जमीनदाराचा खून टीपगो महार या माणसाने केला होता. या संदर्भात केस तत्कालीन राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचे समोर चालविली. ८ व ९ ऑगस्ट १९३५ रोजी दोन दिवस हा खटला चालला होता. आरोपीची बाजू डॉ. आंबेडकर यांनी मांडली होती. याचा उल्लेख पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या दैनंदिनीत ही आहे. ४ जुलै १९३७ रोजी बापूसाहेब यांच्या देहावसनानंतर डॉ. आंबेडकर यांनी राजघराण्यास पत्र लिहून एका न्यायनितज्ञ राजांच्या अपघाती मृत्यू बद्दल दुःख व्यक्त करून रामराजा हरपला असे उदगार पत्रात नमूद केले होते. तसेच या घटनेचा ही उल्लेख केलेला आहे. केस मांडताना डॉ. आंबेडकरांनी फारच कौशल्याने केस मांडली. पण सर्व पुरावे व्यवस्थित विश्लेषित करून खुन्यास बापूसाहेब महाराजांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांचे न्यायदानाचे कौशल्य पाहून डॉ. आंबेडकर ही भारावले होते. त्याचे पश्चात डॉ. आंबेडकर यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून आरोपीकरिता दया दाखविण्यासाठी पत्र देण्याची विनंती केली. हे ऐकून आंबेडकर ही चकित झाले. पुढे एकूण ज्या परीस्थितीत खून झाला हे पाहता फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बापुसाहेबांचे न्यायदान पाहून डॉ. आंबेडकर भारावले होते. ही घटना डॉ. जी. ए. बुवा यांनी या प्रसंगी विषद केली.