समाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रणधीर शिंदे | डॉ. दत्ता घोलप प्रमुख पाहुणे

Edited by:
Published on: June 08, 2024 13:50 PM
views 147  views

कणकवली : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे नाथ पै सेवांगण सभागृहात रविवार 23 जून रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी साक्षेपी समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे.तर संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत तरुण समीक्षक प्रा. डॉ.दत्ता घोलप यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यावेळी संत साहित्याचे आणि साने गुरुजी जीवनचरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक ऍड.देवदत्त परुळेकर व प्रसिद्ध कवी अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिंदे हे मराठीतील आजचे महत्वाचे समीक्षक असून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभागात प्राध्यापक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाङ्मय, दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता, कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळ, (सहलेखक - डॉ. अशोक चौसाळकर), अण्णाभाऊ साठे साहित्य आणि समीक्षा, ढव्ह आणि लख्ख उन (निवडक राजन गवस) आदी ग्रंथ लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. विविध वाङ्मयीन नियतकालिकातून समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध असून मराठीतील साक्षेपी समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. तर डॉ. दत्ता घोलप हे भाषा साहित्याचे तरुण संशोधक असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे मराठीचे अध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांचे आविष्कारविशेष या विषयावर पीएच. डी., मराठी कादंबरी आशय आणि आविष्कार हा ग्रंथ त्यांचा प्रकाशित आहे. विविध नियतकालिकातून वाङ्मयविषय विषयी लेखन त्यांचे सातत्याने प्रसिद्ध होत असते. 

संमेलनाच्या उद्घघाटन सत्रात कवी डॉ.अनिल धाकू कांबळी यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी काही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.यावेळी सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीला अधिक चालना देणारे ग्रंथ संपादित केल्याबद्दल प्रा.जीजा शिंदे (संभाजी नगर - औरंगाबाद) आणि प्रा संजीवनी पाटील (वैभववाडी) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात साने गुरुजी जीवनचरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक ऍड.देवदत्त परुळेकर यांचे 'साने गुरुजी समजून घेताना'  या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

दुपारी भोजन नंतर तिसऱ्या सत्रात नामवंत कवयित्री आणि पुण्याच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री डॉ.दर्शना कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.नव्या लेखक कवींना प्रेरणा मिळावी या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून कोकणातील साहित्य रसिकांनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिरोडकर आणि मातोंडकर यांनी केले आहे.