सुप्रिया सुळे यांच्या आश्वासनातून जनतेला गाजर दाखवू नका

एकनाथ नाडकर्णी यांचा अर्चना घारेंवर घणाघात
Edited by: संदीप देसाई
Published on: October 29, 2023 17:25 PM
views 64  views

दोडामार्ग : महाविकास आघाडीची सत्ता असताना दोडामार्ग तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न अर्चना घारे यांनी किती वेळा मांडला? सत्तेत असताना आडाळी एमआयडीसी चा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटला नाही का? आता निवडणुक लढवायची आहे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या अश्वासनातून जनतेला गाजर दाखवायचे नुसते उपद्व्याप करु नका. कारण महाविकास आघाडीने आडाळी एमआयडीसीला कधीच महत्व दिल नाही. अशी टीका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजप उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली आहे. 

आडाळी एमआयडीसीत उद्योग आणण्यासाठी अर्चना घारे यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. याची जाणीव स्थानिकांना आहे. आघाडी शासनात राष्ट्रवादीच्याच आदिती तटकरे या उद्योग खात्याच्या राज्यमंत्री होत्या. हे अर्चना घारे यांना माहिती नव्हतं कां? त्यावेळी स्वतःच्या पक्षाकडे उद्योगमंत्रीपद असताना आडाळी एमआयडीसी त्यांना दिसली नाही का? आणि आता भाजपने एमआयडीसीचा मुद्दा लावून धरल्यावर त्यांना रोजगाराचा प्रश्न दिसू लागला आहे. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास नसल्याने सुप्रिया सुळेना पर्यटनसाठी घेऊन आल्यावर त्यांना आणखी काय सांगणार म्हणून केवळ एमआयडीसी चा प्रश्न सांगितलला असावा. सत्तेत असतानाही माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वात भाजपने स्थानिक कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता.

आज मेळाव्यात भाषण करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता या आंदोलनात सहभागी झाला नव्हता. अर्चना घरे व त्यांच्या नेत्यांकडून जनतेची दिशाभूल करण्याची केविलवाणी धडपड केली जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोजगार प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्यातील काम करण्याची धडाडी पाहूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील आहेत. आडाळीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून चांगले उद्योग येतील. राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरु असून माजी आमदार राजन तेली यांचा पाठपुरावा सुरु आहे.

रोजगार निर्मितीला आमचे प्राधान्य असून नाहक टिका करुन अर्चना घारे यांनी वातावरण बिघडवू नये. शहरांतल्या अर्चना घारेनी आदी गावं आणि गावाचे प्रश्न समजून घ्यावेत. लोकांच्या ओळखी वाढवाव्यात. नंतर २०२९ च्या निवडणुकीत स्वतःला अजमावून बघावे. भाजपवर टिका करणाऱ्या सुप्रिया सुळेच्या हस्ते विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किट वाटप केले, हा विरोधाभास कशाला ? मग केंद्रातील योजनाचा लाभ मिळवून देताना भाजपवर टिका करतात, हा दुटप्पीपणा जनतेला कळतो. याचं भान अर्चना घारेनी ठेवाव. अजित पवार बाहेर पडल्यानेच आज पवार फॅमिलीला उर्वरित राज्य दिसू लागले. अन्यथा बारामती च्या विकासापलीकडे त्यांनी अन्य कोणत्याही प्रांताच्या विकासाचा कधी विचार देखील केला नाही. अशी झमझणीत टीका भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी अर्चना घारे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केली आहे.