सौंदर्यांला बाधा नको, बॅनर्सवरून प्रशासन ऍक्शनमोडवर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2025 20:18 PM
views 83  views

सावंतवाडी : शहर आणि मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा येईल असे बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स लावल्यास कारवाई करण्यात येईल, प्रिंटर्सनी नगरपरिषदेच्या परवानगी शिवाय ते बनवून देऊ नये असे निर्देश मुख्याधिकारी सौ.अश्विनी पाटील यांनी दिले.सावंतवाडी शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि प्रिंटर्स व प्रकाशकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याधिकारी अश्विनी पाटील, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते.

शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्सवर १ मे पासून कारवाई केली जाईल असे मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील यांनी सांगितले. सावंतवाडी शांतता समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. जनहित याचिका 155/2011 च्या अनुषंगाने शहरातील अनधिकृत बॅनर हटवणे आवश्यक असल्याने, या संदर्भात माहिती देण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती असे त्यांनी सांगितले. सावंतवाडी नगरपरिषदे मार्फत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स आदी लावण्यासाठी  सहा ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यात एस. पी. के कॉलेज कॉर्नर,

नगरपरिषद कार्यालयाच्या गेट न.२ लगत, एस. टी स्टँड समोरील भिंत, बापूसाहेब पुतळा समोरील मोकळी जागा, जुना शिरोडा नाका, गवळी तिठा यांचा समावेश आहे असे मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, अनंत जाधव,विनायक रांगणेकर, रवी जाधव, अभिषेक सावंत, संजय लाड,  सीमा मठकर, तारक पिळणकर आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत जनरल जगन्नाथराव भोसले बालोद्यान, काॅलेज काॅर्नर, पेट्रोल पंप जवळ नवीन जागा निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. न्यायालयांचे आदेशांचे तंतोतंत पालन केले पाहिजे तसेच मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा येईल असे बॅनर्स पोस्टर्स लावले जातात त्याबद्दल खबरदारी घ्यावी असे ठरले.मुख्याधिकारी अश्विनी पाटील म्हणाल्या, नगरपरिषदेच्या पुर्व परवानगी शिवाय प्रिंटर्स नी छपाई करू नये तसेच प्रकाशकांनी बॅनर्स पोस्टर्स लावले तर कारवाई करण्यात येईल. जरूर तर नगरपरिषद आणि पोलिस यासाठी संयुक्तपणे कारवाई करतील असे सांगितले.