
बांदा : “विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, ध्येयधारणा व प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर आयुष्यात मोठे होऊन समाजाला दिशा द्यावी. तसेच, आपल्या शाळेचे संस्कार व शैक्षणिक पायाभूत योगदान लक्षात ठेवून शाळेकडे मागे वळून पाहण्याचे कार्य करावे,” असे प्रतिपादन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी येथे केले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने येथील खेमराज मेमोरीयल प्रशालेस आधुनिक वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात मदत होणार आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नंदू नाईक, पर्यवेक्षक प्रमोद सावंत, शिक्षक सूर्यकांत सांगेलकर, शुभा गावडे शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दयानंद कुबल यांच्या हस्ते वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्या मनोगतात पुढे बोलताना श्री. कुबल म्हणाले की, “शिक्षण हाच खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचा पाया आहे. शाळेतील संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शनच विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेते. त्यामुळे आयुष्यात मोठे झाल्यानंतर आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.” शाळेच्या वतीने या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सावंत यांनी केले. आभार सूर्यकांत सांगेलकर यांनी केले. यावेळी पत्रकार नीलेश मोरजकर, संस्थेचे पदाधिकारी प्रथमेश सावंत, सुरज कदम, प्रीती पांगे, साक्षी पोटे, योगिता निजामकर,पद्माकर शेटकर आदी उपस्थित होते.










