
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडीकडून 25 हजार तर एका स्वामी भक्ताकडून 25 हजार रुपयाची देणगी देण्यात आली. यासाठी संस्थेने त्यांचे आभार मानले आहेत.
कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडीच्या चेअरमन श्रीमती आनमारी डिसोजा, व्हा. चेअरमन पिटर दिमा, सेक्रेटरी मार्टिन आल्मेडा, जनरल मॅनेजर जेम्स बोर्जिस यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला 25 हजार रुपयांचा धनादेश दिला. तर एका स्वामी भक्ताने या सेवाभावी कार्याला 25 हजार रुपये दिले. संस्थेच्या वतीने या दात्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व रवी जाधव यांच्याकडून आभार मानण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था आहे. "सामाजिक कार्याचा निर्धार, जनसमान्यांचा आधार" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. याच ब्रीदवाक्य नुसार ते प्रत्येकाच्या संकटाला धावून जाऊन त्यांना मदत करतात. आज त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी संकल्प केलेल्या रुग्णवाहिकेसाठी दात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या दहा दिवसातच ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी धावणार आहे असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश व उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी सांगितले आहे. याचप्रमाणे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनीही या संस्थेच्या कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.












