सावंतवाडीचं हृदय मोती तलावाचा दिडशे वर्षांचा काठ खचतोय

दगडी बांधकामाचा लूक देण्याची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: March 28, 2026 14:04 PM
views 124  views

सावंतवाडी : शहराच हृदय असणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावाचा काठ खचत चालला आहे. राजवाडा ते उपजिल्हा रुग्णालय परिसरातील पूर्ण दगडी भाग कोसळून तिथे सिमेंट कॉक्रीटची भिंत उभी राहिली आहे. कोर्ट परिसर, न.प. समोरील भागासह शिव उद्यापर्यंतचा काठ हा दगडी बांधकामाचा आहे. मात्र, दिडशे वर्षांचा हा दगडी कठडा आता शेवटच्या घटका मोजत आहे. 


शहरातील मोजक्या दगडी बांधकामापैकी एक असा हा तलाव असून छोट्या धरणाचा भाग आहे. दीडशे वर्षांपूर्वी या तलावाचे बांधकाम करण्यात आले होते‌. मात्र, आता हा कठडा खचत चालला आहे. ढासळत चालेले दगड बघता तो कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात तलावातील पाण्याची पातळी घटल्याने खचलेला काठ प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षिततेची दक्षता घेताना दगडी बांधकामापैकी एक काठ देखील इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. आजच्या काळात असं बांधकाम करण शक्य नसल्याने बोडक्या भिंतींऐवजी निदान दगडी बांधकामाचा लूक तलाव काठाला देण्यात यावा अशी अपेक्षा देखील सावंतवाडीकरांकडून व्यक्त केली जात आहे.