
दोडामार्ग : बुधवार पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी तर दोडामार्ग तालुक्यांत अक्षरशः हाहाकार माजविला. धो - धो कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नदी - नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल, कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. तर कुंब्रल येथे एका घरावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली असून येथे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र दोडामार्ग तिलारी राज्यमार्गाच्या साईडपट्टीवर असलेली झाडे मोडून व उन्मळून पडल्याने आंबेली येथे दुचाकीला अपघात तर तीलारीत वाहतूक कोंडी झाली.
तालुक्यांत सुरू असलेल्या पावसामुळे कुंबल रूमडाची गोठण येथे एकाच्या घराजवळ दरड कोसळली. सुदैवाने लगत असलेले घर यातून बचावले असले तरी घरातील कुटुंबियांची भीतीने गाळण उडाली. तर दोडामार्ग - कोल्हापूर राज्यमार्गावर झाडांची तिलारी व आंबेली येथे पडझड झाली. यात आंबेली येथे तर कोसळलेल्या झाडाखाली एक दुचाकीस्वार सुदैवाने बचावला.
तिलारी शेटवेवाडी येथे तर भले मोठे झाड उन्मळून पडले. सुदैवाने ते झाडं रस्त्यापलिकडील दुसऱ्या झाडाला अडकल्याने एक फांदी तोडून स्थानिकांनी रस्ता वाहतुकीस तात्पुरता खुला केला आहे. काशिनाथ उर्फ अण्णू शेटवे व ऑलवीन लोबो व शेटवेवाडी येथील ग्रामस्थानी यासाठी मेहनत घेतली.अनेक ठिकाणी गटार तुंबून गटाराचे पाणी रस्त्यावर आले. मात्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यात जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले.
दोडामार्ग बाजारपेठ ते गोवा रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागली. एकंदरीत अतिवृष्टीमुळे सर्वच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बांधकाम खात्याच्या अनास्थेने केलेल्या कामांवर ओतलं पाणी...
कधी नव्हे ते यावर्षी दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग तिलारी वीजघर, दोडामार्ग - बांदा, दोडामार्ग आयी हे तिन्ही राज्यमार्ग बांधकाम खात्याने यावर्षी खड्डे मुक्त केले. मात्र याच खात्याने या रस्त्यांच्या गटार व्यवस्थापन, साईडपट्टी मजबुती करण आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली धोकादायक झाडी तोडण्यास अनास्था दाखविल्याने बांधकाम खाते काम करूनही नागरिकांच्या रोशास कारणीभूत ठरले आहे. अधिकाऱ्यांनी या त्रुटी दूर केल्यास निश्चितच बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने यावर्षी केलेल काम अधोरेखित होणारे आहे.