सासोलीत महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने परप्रांतीय कंपनीची दडपशाही..?

ॲड. अनिल केसरकरांचा गंभीर आरोप | तहसीलदारांना निवेदन
Edited by: लवू परब
Published on: May 18, 2026 20:24 PM
views 74  views

दोडामार्ग :  सासोली येथे महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने एका परप्रांतीय कंपनीमार्फत चालू असलेल्या दडपशाहीबाबत तसेच अवैध माती उत्खननावर कारवाई करावी. अन्यथा मनसेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, सासोली येथे एका परप्रांतीय कंपनीमार्फत गावातील सामाईक जमीन क्षेत्र असलेल्या जमिनीत सहभागदारांची रीतसर व काय‌द्याने आवश्यक असलेली परवानगी न घेता खरेदी करण्यात आल्याचे दिसून आलेले आहे. या कंपनीमार्फत सासोली गावातील ज्या मिळकतींमधील शेकडो एकर क्षेत्र खरेदी करण्यात आलेले आहे, त्या मिळकती ग्रामस्थांच्या सामाईक मालकीच्या मिळकती असून अद्याप पर्यन्त या मिळकतीच्या सहभागदारांमध्ये आपापसात धडेवाटप झालेले नाही. त्यामुळे सहभागदारांचे नेमके क्षेत्र ठरलेले नसताना या परप्रांतीय कंपनीने महसूल यंत्रणेला पैशाच्या जोरावर हाताशी धरून खरेदीखते पूर्ण केलेली आहेत. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आपली मालकी व वहिवाट असलेल्या जमिनी या परप्रांतीय कंपनीच्या दडपशाहीच्या प्रकारामुळे व महसूल यंत्रणेने सर्व नियम धाब्यावर बसवून या कंपनी सोबत संधान साधून जे आर्थिक व्यवहार केले आहेत त्यामुळे कायमचे मुकावे लागले आहे.

या मिळकतींबाबत आपल्या महसूल यंत्रणेने ज्या बिनशेती सनदा मंजूर केलेल्या आहेत त्या सर्व सनदा देखील अपूऱ्या कागदपत्रांच्या आधारे मंजूर करण्यात आल्या असून तशा प्रकारचा शेरा या सनदा मंजूर करताना नमूद करण्यात आलेला आहे. महसूल यंत्रणेला हाताशी धरून एक परप्रांतीय कंपनी आपली फसवणूक करत आहे हि बाब ध्यानात आल्यानंतर सासोली ग्रामस्थांनी या कंपनी विरुद्ध व महसूल यंत्रणेविरुद्ध अनेक उपोषणे, आंदोलने देखील केलेली आहेत. मात्र निर्ढावलेली महसूल यंत्रणा या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीला उभी राहण्याएवजी या परप्रांतीय कंपनीच्या बाजूने ढाल बनून उभी राहिली आहे हि बाब संतापजनक आहे, ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर निषेध करतो असे निवेदनात नमूद केले आहे.

या परप्रांतीय कंपनीच्या बाजूने उभे राहून बेकायदेशीर गोष्टींना अप्रत्यक्ष मदत करण्यापेक्षा जे गरीब, स्थानिक शेतकरी या परप्रांतीय कंपनीच्या दडपशाहीमुळे भरडले जात आहेत त्यांना प्रशासनाने मदत करावी. सर्व नियम धाब्यावर बसवून या परप्रांतीय कंपनीला ज्या अकृषिक सनदा मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व सनदा रद्द करण्यात याव्यात. या अकृषित सनदा मंजूर करण्यात महसूलच्या ज्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, त्या सर्वांची खातेनिहाय चोकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच या कंपनीमार्फत चालू असलेले माती उत्खनन करण्याचे काम तातडीने थांबविण्यात यावे. अन्यथा मनसेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना‌द्वारे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी तहसीलदार यांना दिला आहे. तहसीलदार राहुल गुरव यांना हे निवेदन दिले असून यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, सरचिटणीस तथा जिल्हा संपर्कप्रमुख संदीप दळवी, उपजिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर, सुधीर राऊळ यांसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.