महाराजस्व समाधान शिबिर वेळेआधीच गुंडाळल्याचा आरोप

दोडामार्ग तहसीलदारांनी आरोप फेटाळले
Edited by: लवू परब
Published on: May 15, 2026 18:17 PM
views 44  views

दोडामार्ग : महसूल व वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या नियोजनावरून सासोली येथील ग्रामस्थ मनोज गवस यांनी शिबिर वेळेआधीच आवरते घेतल्याचा आरोप करत ग्रामस्थांच्या समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची टीका केली आहे. मात्र, तहसीलदारांनी हे आरोप फेटाळून लावत शिबिर नियोजित वेळेतच पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे.

महसूल मंडळ तळकट कार्यक्षेत्रातील तळकट, उगाडे, झोळंबे, फुकेरी, खडपडे, कुंभवडे, कुंबरल, शिरवल, भिकेकोनाळ, सासोली, कळणे, मोरगाव, आडाळी आणि फोंड्ये या गावांतील नागरिकांसाठी शुक्रवारी झोळंबे येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेत सकाळी ११ वाजता या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात उत्पन्न व जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड दुरुस्ती व नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजनेचे मार्गदर्शन तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी यांसारख्या विविध सेवा देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.

शिबिरस्थळी तहसीलदार राहुल गुरव अनुपस्थित असल्याबद्दल मनोज गवस यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी नायब तहसीलदार संजय मद्रे यांनी तहसीलदार मान्सूनपूर्व आढावा बैठकीसाठी गेले असल्याचे सांगितले. शासनाकडून शिबिराचे आदेश दीड महिन्यांपूर्वी प्राप्त झाले असताना त्याच दिवशी बैठक ठेवण्याची गरज काय होती, असा सवाल गवस यांनी उपस्थित केला. तसेच महसूल प्रशासन नागरिकांच्या अडचणींबाबत कितपत गंभीर आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यावर स्पष्टीकरण देताना नायब तहसीलदार संजय मद्रे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून चार दिवसांपूर्वी बैठकीचे पत्र प्राप्त झाल्याने तहसीलदारांना उपस्थित राहणे आवश्यक होते, असे सांगितले. तसेच तुमचे निवेदन स्वीकारण्यास प्रशासन तयार असल्याचेही त्यांनी गवस यांना सांगितले.

मनोज गवस यांनी पुढे आरोप केला की, दुपारी सुमारे १ वाजता शिबिरस्थळी पोहोचल्यानंतर अधिकारी व कर्मचारी साहित्य आवरण्याच्या तयारीत होते. ग्रामस्थांच्या महसूलविषयक अडचणी सोडवल्या जातील, या अपेक्षेने आम्ही शिबिरात आलो होतो; मात्र वरिष्ठ अधिकारी नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार राहुल गुरव याबाबत विचारले असता आपण मान्सूनपूर्व नियोजन बैठकीसाठी गेलो होतो, मात्र शिबिर नियोजित वेळेनुसारच पार पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.