
दोडामार्ग : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा - एनडीएने मिळवलेल्या प्रचंड विजयाचा आनंदोत्सव दोडामार्गात उत्साहात करण्यात आला. विजयाची पहिली बातमी लागताच भाजपाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष सुरू झाला. दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा निनाद आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दोडामार्गात अक्षरशः ‘विजय महोत्सवा’चे रूपांतर झाले.
या दणदणीत यशावर भाष्य करताना भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने पुढे जात आहे. जनतेने केलेला हा विजयाचा निर्णय म्हणजे विरोधकांच्या खोटारडेपणा, दिशाभूल आणि सत्ता लोभी राजकारणाला मिळालेली तडाखेबंद चपराक आहे! बिहारने दिलेला हा संदेश संपूर्ण देशाला दिशा दाखवणारा आहे.”
विजयोत्सवावेळी कार्यकर्त्यांनी आकाशाला भिडणाऱ्या गगनभेदी घोषणा दिल्या “नरेंद्र मोदी आगे बढ़ो!”, “भारत माता की जय!”, “जय श्री राम!” च्या घोषणानी परिसर दणाणला. या घोषणांनी दोडामार्गचा परिसर अक्षरशः दणाणून गेला. मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
या विजय जल्लोषात भाजपा मंडळातील सर्व पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
विजयाची आनंदवार्ता ऐकताच कार्यकर्त्यांनी एकच घोषणा सुरू केली. दोडामार्गातील हा उत्सव भाजपा कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वास, संघटित शक्ती आणि मोदी नेतृत्वावरील ठाम विश्वासाची झलक देणारा ठरला.












