
दोडामार्ग : तिलारी धरण परिसराला पर्यटनदृष्ट्या अधिक विकसित करण्यासाठी आमदार दिपक केसरकर यांनी नुकतीच धरणाची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन धरण परिसरातील भू-उपलब्धता, संभाव्य विकासकामे आणि पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.
जलसंपदा विभागाकडे किती जमीन उपलब्ध आहे आणि त्या जमिनीचा पर्यटन विकासासाठी कसा वापर करता येईल? याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. याबाबत माहिती देताना अधिकारी म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना १०.५० हेक्टर जमीन आधीच हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जमीन पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी वापरली जाणार आहे. तसेच, उर्वरित जमिनीबाबतही माहिती घेण्यात आली. या जमिनीचा योग्य वापर करत धरण परिसरात नैसर्गिक सौंदर्य जपत पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा निर्माण करणे यावर भर देण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक प्रकल्प, होमस्टे सुविधा, बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, तसेच स्थानिकांना रोजगार मिळेल अशा उपक्रमांवरही चर्चा झाली. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतील, यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही केसरकर यांनी अधोरेखित केले.
यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव, उपकार्यकारी अभियंता गजानन बुचडे, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, रामदास मेस्त्री, गुरुदास सावंत, अनिल गवस, सज्जन धाऊसकर स्वप्नील निंबाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.