येत्या काळात दोडामार्ग विकासात आघाडीवर असेल : मंत्री दीपक केसरकर

कोट्यवधींच्या कामांचं मंत्री केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण - भूमिपूजन
Edited by:
Published on: March 10, 2024 13:58 PM
views 176  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका हा सर्वात लहान तालुका असून या तालुक्यावर माझे विशेष प्रेम आहे. या तालुक्यातील रुग्णालय, पंचायत समिती इमारत, प्रमुख रस्ते, महत्वाची पुले, क्रीडांगण आणि नाट्यगृह अशी बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. यामुळे येत्या काळामध्ये हा तालुका विकास प्रक्रियेत जिल्ह्यात आघाडीवर असेल असे प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी केल. 

दोडामार्ग तालुक्यात शिवसेना व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अधिक बोलताना ते म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील जवळ जवळ सर्वच विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जी काही राहिली आहेत त्यांनीही येत्या काळात मंजुरी दिली जाईल. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय, नाट्यगृह, क्रीडासंकुल अशा प्रकारची अनेक कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. शिवाय प्रमुख रस्ते व तालुक्यातील जवळपास सर्वच छोट्या मोठ्या पुलांसाठी निधी दिलेला आहे. यापुढेही तालुक्यात अशाच प्रकारे विकासाची गंगा नांदेल अशा शब्दांत दोडामार्ग वासियांना आश्वाशित केलं आहे.

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांतील विकास कामांची भूमिपूजने व लोकार्पण रविवरी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाली. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, जिल्हा समन्वयक प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, तीलकांचन गवस, उपतालुका प्रमुख दादा देसाई, संदीप गवस, सूर्यकांत गवस, मायकल लोबो, स्वप्नील निंबाळकर, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, मेढे सरपंच सोनाली गवस, विलास सावंत, विशांत तळवडेकर, गुरुदास सावंत यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कामांचं झालं भूमिपूजन आणि लोकार्पण

दोडामार्ग तालुक्यात बरीच वर्षे मागणी असलेल्या मूळस हेवाळे पुलाच काम बहुतांशी पूर्ण झाल्याने त्याच लोकार्पण रविवारी करणेत आलं. हे पुल व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. या ठिकाणच्या कमी उंचीच्या पुलामुळे ग्रामस्थ वाहून जात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या पुलासाठी मात्र मोठा निधी आवश्यक होता. यात विशेष लक्ष घालून नामदार केसरकर यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाल्यामुळे या पुलाचे काम पूर्ण झाले असून त्या कामाचे ही लोकार्पणही मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

तसेच घाटिवडे येथील पुलाचेही भूमिपूजन त्यांचे हस्ते झाले. या ठिकाणीं पावसात मातीचे ढीग रस्त्यावर येऊन वाहतूक विस्कळीत व्हायची. शिवाय पूरपरिस्थिती ही निर्माण व्हायची. त्यामुळे या ठीकाणी नवीन पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. त्या ठिकाणी आता नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

तर पाळये येथे २०१९ च्या पावसात कॉजवे वाहून गेला होता. त्याठिकाणी नवीन कॉजवे तथा पुल उभारण्याची मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून होत होती. अशा सर्व जिव्हाळ्याच्या कामांना मंजुरी देत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व कामांना सुरवात होत असल्या बद्दल ग्रामस्थांनीही मंत्री केसरकर यांचे आभार मानले.  त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करणेत आला. 

'त्या' मुलांसाठी २ लाखांच्या मदतीची घोषणा..

हेवाळे येथील मुळस - हेवाळे पुलावरून वाहून जाऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या  दोन मुलांना प्रत्येकी एक लाख रुपये देणार असल्याचेही  मंत्री केसरकर यांनी नवीन पुल लोकार्पण प्रसंगी जाहीर केले.

दरम्यान  पाळये रस्त्यावर पुल बांधणे ( १ कोटी ५० लक्ष रुपये ), हेवाळे घाटीवडे पुल बांधकाम करणे ( १ कोटी १७ लक्ष रुपये ), मणेरी माऊली मंदिर समोर सभागृह बांधणे, मुळस - हेवाळे पुलाचे लोकार्पण सोहळा  ( ५ कोटी ५० लक्ष ), मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तळकट - कोलझर नदीवर पुलाचे भूमिपूजन ( रक्कम २ कोटी ४१ लक्ष रुपये ) इतका मोठा निधी उपलब्ध असलेल्या कामांचे मंत्री केसरकर यांनी भूमिपूजन केल्याने व हेवाळे पुलाचे लोकार्पण केल्याने शिवसैनिकांचा उत्साह सुद्धा तितकाच वाढला आहे.