
दोडामार्ग : राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी वनराई बंधारे घालण्याचे आदेश दिल्यानंतर दोडामार्गमधील आंबडगाव येथे पाणी टंचाईची कमतरता बघून आमदार दीपक केसरकर, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामात व दोडामार्ग मधील प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत बंधारे उभारले.
आंबडगाव येथे सोमवारी या वनराई बंधाऱ्यांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार दीपक केसरकर, जि.प अध्यक्ष प्रमोद कामात, जि.प. सदस्य दीपक गवस, सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेश प्रसाद गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जि.प. सदस्य साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर, स्नेहा गवस, राजू निंबाळकर, सुधीर दळवी, सरपंच स्नेहा गवस, श्रुती देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपाभियंता सीमा गोवेकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक गावात बंधारे घाला...
दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत आज आंबडगाव येथे वनराई बंधारे घालण्याचे नियोजन केल्याने जि.प. सदस्य व पंचायत समिती सदस्य सभापती, उपसभाती, गटविकास अधिकारी व सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अशा प्रकारे प्रत्येक गावात वनराई बंधारे घालून पाणी आडवा पाणी जिरवा हा संकल्प रुजवा. जेणे करून कोणालाही पाण्याची कमतरता भासता नये असे ही आवाहन केसरकर यांनी प्रशासनाला व लोकप्रतिनिधीना केले.
प्रसंगी तिलारीचे पाणी टँकरने पोहचवू...
केसरकर म्हणाले की, वनराई बंधारे घालून जो पर्यंत पाणी मिळेल तो पर्यंत ठीक आहे. पाणी अडवा पाणी जिरवा बंधारे घालूनही पाण्याची कमतरता भासली तर तिलारी धरणाचे पाणी टँकरने जनते पर्यंत पोहचवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.










