दोडामार्ग पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूचे पकडले घबाड

आरोपींची नावे गुलदस्त्यात
Edited by: संदीप देसाई
Published on: March 27, 2024 13:06 PM
views 380  views

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी मंगळवारी रात्री कुंभवडे येथे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूक प्रकरणी २६ वर्षीय दोघा युवकांवर धडक कारवाई केली आहे. ५ लाखांच्या दरुसह १२ लाखांच्या मुद्दे मालाच मोठ घबाड पोलिसांनी या कारवाईत ताब्यात घेतलं आहे. या धडक कारवाईचे स्वागत होत असले तरी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांचे गोवा सीमेंवर तपासणी नाके सुरू असताना ही दारू तालुक्यात दाखल झालीच कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुक प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास केलेल्या कारवाई नंतर दोन २६ वर्षीय संशयित युवकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ),(इ), ८१, ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ लाख ४३ हजार २०० रुपयांच्या दारु सहीत वाहन मिळून एकूण १२ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

       दोन संशयित इसम हे महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने मंगळवारी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास कुंभवडे मार्गे घाटमाथ्यावर जात होते. त्याठिकाणी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी व त्यांची टीम हे गस्त घालत होते. दरम्यान गावातील श्रीदेवी सातेरी भावई मंदिरासमोर गाडी आली असता  पोलिसांनी तपासणीसाठी थांबविली. यावेळी गाडीची झडती घेतली असता गाडीत प्रत्येकी ७५ रुपये किंमतीच्या गोल्डन एस फाईन व्हिस्की लेबलच्या १८० मिली मापाच्या ४८ बाटल्यांचे १५ बाॅक्स, ९० रुपये किंमतीच्या हेवर्ड फाईन व्हिस्की लेबलच्या १८० मिली मापाच्या ४८ बाटल्यांचे १० बाॅक्स, ८०० रुपये किंमतीच्या डीएसपी ब्लॅक लेबलच्या ७५० मिली मापाच्या १२ बाटल्यांचे ९ बाॅक्स, २०० रुपये किंमतीच्या डीएसपी ब्लॅक लेबलच्या १८० मिली मापाच्या ४८ बाटल्यांचे १९ बाॅक्स, ३५० रुपये किंमतीच्या हेवर्ड फाईन व्हिस्की लेबलच्या ७५० मिली मापाच्या १२ बाटल्यांचे १० बाॅक्स, ३६० रुपये किंमतीच्या गोल्डन एस फाईन व्हिस्की लेबलच्या ७५० मिली मापाच्या १२ बाटल्यांचे २५ बाॅक्स व १५० रुपये किंमतीच्या किंगफिशर स्ट्राॅंग बीअर लेबलच्या ५०० मिली मापाचे २४ डब्यांचे ५ बाॅक्स गोवा बनावटीची बिगर परवाना दारू आढळली. पोलिसांनी दारू व ७  लाख रुपये किमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी असा एकूण १२ लाख ४३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बिगर परवाना दारूची वाहतुक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.