दोडामार्ग नगरपंचायतला स्वच्छतेत स्टार रेटिंग मानांकन !

गार्बेज फ्री सिटीच्या श्रेणीमध्ये मिळविले यश : नगराध्यक्ष चेतन चव्हाण
Edited by: संदीप देसाई
Published on: January 16, 2024 10:07 AM
views 102  views

दोडामार्ग : स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणमध्ये जीएफसी अर्थात गार्बेज फ्री सिटी च्या श्रेणीमध्ये दोडामार्ग नगरपंचायतला स्टार रेटिंग मानांकन मिळाले आहे. शहरातील नागरिकांनी नगरपंचायत ला केलेलं सहकार्य आणि सहकाऱ्यांची मिळालेली साथ, स्वच्छता कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दै. कोकणसादशी बोलताना दिली आहे. 

       तळकोकणात  दोडामार्ग शहर सर्वात स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था - मंडळे या सर्वांचे विशेष सहकार्य अपेक्षित असल्याचेही ते यावेळी आवर्जून म्हणाले.

दरम्यान केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत जीएफसी श्रेणीच्या मानांकन मिळविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये कोंकणातील विशेषत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा,  नगरपंचायती यांनी सहभाग घेतला होता. कसई - दोडामार्ग नगरपंचायतने देखील या मानांकनासाठी सहभाग नोंदविला होता. त्या अनुषंगाने नगरपंचायतला अर्थात दोडामार्ग शहराला या अभियानात केलेल्या चोख कामामुळे स्टार रेटिंग मिळाली आहे. 


 लोकसहभागच महत्वाचा : चेतन चव्हाण  

केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली कसई दोडामार्ग नगरपंचायत आपल्यापरीने स्वच्छ्तेसंदर्भात प्रभावी नियोजन करत आहे. नजीकच्या काळात जिल्ह्यातील एक आगळेवेगळे शहर म्हणून ओळख मिळविण्यासाठी नगरपंचायतला शहरातील प्रत्येक प्रभागांमधील नगरसेवक आणि नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. नगरपंचायतचे सर्व स्वच्छ्ता दूत तसेच प्रशासन, लोकप्रतनिधी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सुचनांची शहरातील तसेच बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी यांनी अमंलबजावणी केल्यास नजीकच्या काळात संपूर्ण कसई - दोडामार्गची एक सुंदर शहर म्हणून  जिल्ह्यातच नव्हे तर राज्य व देशपातळीवर सुध्दा एक वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. 

प्लास्टिक हद्दपार करणे काळाची गरजच !

प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीच्या अनुषंगाने झालेला शासन निर्णय पाहता दोडामार्ग बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सहजपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या उपलब्ध करून देणे बंद केलं आहे. त्याचे यापुढे तर सर्व व्यापाऱ्यांनी कटाक्षान अमंबजावणी करून नगरपंचायतला पर्यायाने आपल्या शहराचे स्वास्थ चांगल रहाव यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी सहकार्य द्यावे असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर नगरपंचायत मार्फत दररोज सकाळी, दुपार, संध्याकाळ या तिन्ही वेळामध्ये घटांगडी फिरविली जाते. शिवाय बऱ्याच ठिकाणी कचरा कुंडीही उभारण्यात आल्या आहेत. मात्र असे असताना देखील काहीजण चांगल्या स्वच्छ जागेत कचरा टाकणे, प्लास्टिक जाळणे आदी प्रकार कोणी करत असतील तर सजग नागरिकांनी  त्याचीही माहिती नगरपंचायतला देणे आवश्यक आहे. आपल शहर आणि परिसरात स्वच्छ राखण, शहरातून प्लास्टिकला हद्दपार करून गार्बेज फ्री सिटी बनविण हे प्रत्येकाचे कर्तव्य असून स्वच्छ्ता उपक्रमाला सहकार्य न करणाऱ्यांवर यापुढे नगरपंचायत प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील श्री. चव्हाण यांनी दिला आहे.