
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचे सन २०२३-२४ या वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पत्रकार रत्नदीप फटी गवस, तर विशेष पत्रकारिता पुरस्कार पत्रकार शंकर मधुकर जाधव यांना जाहीर झाला. समितीचे अध्यक्ष संदीप देसाई व पदाधिकारी यांनी या पुरस्कारांची शनिवारी घोषणा केली आहे. दोडामार्ग तालुका पत्रकार समितीची बैठक शनिवारी अध्यक्ष संदीप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दोडामार्ग येथे घेण्यात आली. या बैठकीला सचिव गणपत डांगी, उपाध्यक्ष शंकर जाधव, खजिनदार रत्नदीप गवस, सदस्य वैभव साळकर, तेजस देसाई, सुहास देसाई, संदेश देसाई, महेश लोंढे, ऋषीकेश धर्णे, लखू खरवत, समीर ठाकूर, ओम देसाई उपस्थित होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कारासाठी निवड झालेले गणपत डांगी यांचा सर्वप्रथम अभिनंदन ठराव घेण्यात आला. त्यांनतर साधक बाधक चर्चा करून गेल्या वर्षभरात दोडामार्ग तालुक्यात पत्रकारितेत उत्कृष्ठ योगदान दिलेल्या पत्रकारांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अध्यक्ष संदीप देसाई यांनी घोषणा केल्यानंतर पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकारांच अभिनंदन करण्यात आले. तर सरपंच म्हणून कार्यरत असताना प्रत्येक पत्रकार समितीच्या कार्यक्रमात विशेष योगदान देणारे पत्रकार लखू खरवत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. ६ जानेवारी रोजी पत्रकार समिती मार्फत पत्रकार दिन साजरा करण्याबाबतही नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष संदीप देसाई यांनी केले आहे.