मतमोजणीसाठी दोडामार्ग प्रशासन सज्ज ; ३ फेऱ्यात निवडणूक निकाल होणार जाहीर!

फुकेरीपासून मतमोजणीस सुरूवात तर शेवट पिकुळे ग्रामपंचायतीने होणार
Edited by: संदीप देसाई
Published on: December 20, 2022 09:05 AM
views 295  views

दोडामार्ग : तालुक्यात झालेल्या २५ ग्रामपंचायत निवडणूक मतदानाची मतमोजणी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून येथील तहसीलदार कार्यालयात पहिल्या मजल्यावरील खुल्या सभागृहात होणार आहे. यासाठी ९ मतमोजणी कंपार्टमेंट करण्यात आले असून एकाच वेळी ९ ग्रामपंचायतची थेट सरपंच पदाची व सदस्यांसाठीची मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत फुकेरीपासून मतमोजणीची सुरुवात होणार असून शेवटची मतमोजणी पिकुळे ग्रामपंचायतची म्हणजेच तालुक्यातील सर्वाधिक थेट सरपंच पदाचे ७ उमेदवार व सदस्य पदाचे २० उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीची होणार आहे.

एकूण तीन फेऱ्यांमध्ये दोडामार्ग तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यात पहिल्या फेरीत  फुकेरी, झोळंबे, तळकट, कोलझर, मोरगाव, कुंब्रल, आडाळी, कळणे व सासोली या ९ ग्रामपंचायतीचे मतमोजणी होणार आहे.

 दुसऱ्या फेरीत परमे - पणतुर्ली, मणेरी, घोडगेवाडी, कोनाळ, बोडदे, घोटगे, मांगेली झरेबांबर-आंबेली व उसप या ९ ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे.  शेवटच्या टप्प्यात तिसऱ्या फेरीत खोक्रल, वझरे-गिरोडे, तळेखोल, आयी, माटणे, आंबडगाव व पिकुळे या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे.  या मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले झाले असून तहसीलदार अरुण खानोलकर व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व निवडणूक शाखेची टीम कामाला लागली आहे. सकाळी ठीक १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने ९ वाजल्यापासून ग्रामपंचायतीच्या उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षामध्ये बोलावण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील २५ ही ग्रामपंचायतचे निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.