
दोडामार्ग : तिलारी नदीपात्रात बेकायदेशीरपणे घातलेला बंधारा हटवून तो बंधारा घालणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाचिटणीस सुधीर दळवी यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, एका व्यक्तीने पर्यावरण विषयक नियमांची पायमल्ली करून आणि जलसंपदा विभागाची कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता तिलारी नदीपात्रात बेकायदेशीर बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रातील पाणी अडवले गेले आहे. याचा दुष्परिणाम या पाण्यावर शेती, बागायती करणाऱ्या शेतकरी कुटुंबावर झाला आहे. शिवाय पाण्याचा प्रवाह बदलून अनेकांच्या शेती, बागायतींचे नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक तहसीलदारांकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी कानावर हात घेत याबाबत चौकशी व कारवाईची जबाबदारी जलसंपदा खात्याची असल्याचे म्हटले आहे. तर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ असा आहे की, या बेकायदेशीर कामाला महसूल आणि जलसंपदा विभागाचे पाठबळ असावे असा आरोप सुधीर दळवी यांनी केला आहे.
वास्तविक हा बंधारा बांधण्यापूर्वी संबंधिताने जलसंपदा विभाग, महसूल विभाग आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याची गरज आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने कुठल्याही विभागाची परवानगी न घेता दादागिरी करून हा बंधारा बांधला आहे. नदीचा प्रवाह अडवणे हा पर्यावरण कायद्यानुसार गुन्हा आहे. या बंधाऱ्यासाठी जलसंपदा विभागानेच निधी दिल्याचा गंभीर आरोप सुधीर दळवी यांनी केला आहे. त्यामुळे सगळे सरकारी अधिकारी पर्यावरणाच्या नाशासाठी धनदांडग्यांना सहकार्य करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी. नदीतील बेकायदा बांध हटवावा आणि निसर्गाच्या विरोधात काम करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अपप्रवृत्तीला वेळीच ठेचावे. तसेच बंधारा घालणाऱ्या व्यक्तीविरोधात गंभीर गुन्हा दाखल करून त्यास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. याबाबत योग्य निर्णय तत्काळ न घेतल्यास हरित लवादाकडे आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे भाजपा जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून व वरिष्ठ स्तरावरून येथील कार्यकारी अभियंत्यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकारी अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी त्या बेकायदेशीर बंधाऱ्याची पाहणी केली. ते लवकरच याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र बांध घालणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार का? याबाबत मात्र अधिकृत माहिती देण्यात आली नाही.










