
दोडामार्ग : गिरोडे येथे खैर प्रजातीच्या लाकडांची बेकायदेशीर साठवणूक केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई करत दीड घनमीटर इतका साठा जप्त केला आहे. या कारवाईने खैर तस्करांचे धाबे दणाणले आहे. दोडामार्ग तालुक्यातून खैर लाकडाची वाहतूक होत असल्याचे वारंवार वनविभागाच्या कारवाईतून समोर येत आहे. अशीच एक कारवाई गिरोडे येथे केली आहे. तेथे खैर प्रजातीच्या लाकडाची साठा केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील, वनपाल श्री. हाके यांसह वनविभागाचे पथक प्रत्यक्ष जागेवर पोहोचले. यावेळी तेथे लाकुड साठा केल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता तो साठा बेकायदेशीर असल्याचे उघड झाले. पंचनामा करून साठा जप्त केला व वनविभागाच्या कार्यालयात आणला.











