आदिशक्ती अभियानात झरे-२ ग्रामपंचायतीची दमदार कामगिरी

महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम | तालुक्यात द्वितीय क्रमांक
Edited by:
Published on: March 16, 2026 18:54 PM
views 12  views

दोडामार्ग : राज्य शासनाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियान २०२५-२६’ अंतर्गत प्रभावी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दोडामार्ग तालुक्यातील झरे-२ ग्रामपंचायतीने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ग्रामपंचायतीच्या कार्याचा सर्व स्तरांतून गौरव होत आहे. झरे-२ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्रुती विठ्ठल देसाई यांच्या पुढाकारातून महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात आले.

समाजात प्रचलित असलेल्या काही जुन्या परंपरांना छेद देत गावातील विधवा महिलांना हळदी-कुंकू कार्यक्रमात सन्मानपूर्वक सहभागी करून घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विधवा महिलांना हळदी-कुंकू देण्याचा मान देणारी झरे-२ ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असून या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. याशिवाय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत झरे-२ ग्रामपंचायतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. गावातील शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय, पर्यावरणपूरक गणपती पूजन तसेच सुंदर घर स्पर्धा अशा उपक्रमांद्वारे ग्रामविकासाला नवे बळ देण्यात आले.

ग्रामपंचायत स्तरावर स्पर्धात्मक विकास साधण्यासाठी सरपंच श्रुती देसाई यांनी स्वतःच्या मानधनातूनही अनेक उपक्रम राबविले, त्यामुळे गावातील महिलांकडून व ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. या उपक्रमांमुळे गावात सामाजिक समतेची आणि महिलांच्या सन्मानाची नवी दिशा निर्माण झाली असून ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.