
दोडामार्ग : जनतेची बांधिलकी जपत नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेणारी दोडामार्ग तालुक्यातील केर - भेकुर्ली ग्रामपंचायत ग्रामस्थांशी डिजिटल कनेक्ट होणार आहे. याचाच भाग म्हणून मोफत वायफाय सुविधा दिली जाणार आहे. गावातील माता - भगिनी यांच्या हस्ते सोमवारी या संकल्पनेचे लोकार्पण होईल अशी माहिती ग्रामपंचायतकडून देण्यात आली. यावेळी सरपंच- रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच - तेजस तुकाराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य - मेघना महादेव देसाई, गायत्री गणपत देसाई, यशवंत राजाराम देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, प्रियंका मंगेश देसाई, लक्ष्मी नारायण धुरी, ग्रामपंचायत अधिकारी - संदीप पाटील उपस्थित होते.
केर गावांत बीएसएनएलचा मोबाईल टॉवर आहे मात्र त्याला मोर्ले येथील टॉवर वरून रेंज सप्लाय आहे. दोन्ही टॉवरना वारंवार रेंज जात असतें शिवाय नेटवर्क स्पीड सुद्धा कमी असतो हे लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने साटेली भेडशी येथून सप्लाय घेत लँडलाईन इंटरनेट सुविधा उपलब्ध केली आहे. याचा मोफत लाभ ग्रामस्थांनी मिळावा, शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यासविषय व्हिडीओ किंवा साधन मिळावे यासाठी सायंकाळी ७ ते रात्री ९ असे दोन तास ही सेवा मोफत दिली जाणार आहे त्यानंतर टप्पाटप्याने सुधारणा केल्या जातील असेही सांगण्यात आले.










