
दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील मुख्य रस्ता ते थोरलेभरडपर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून द्यावा, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासमोर मंगळवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच होते. प्रशासनाच्या वारंवार दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. रस्त्याच्या कामासाठी साटेली भेडशी येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उद्योगाच्या कार्यालय समोर हे आंदोलनास सुरुवात केली. मात्र आंदोलनाकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा मागणी करूनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. प्रशासनाची उदासीनता आणि दिरंगाई यामुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून चौथ्या दिवशीही आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच होते.
विशेष म्हणजे या आंदोलनात महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पार्वती गावडे, संजीवनी तांबे, रोशनी गवंडळकर, सुनंदा गवस, सविता देसाई, शुभांगी नाईक, सुमित्रा मेस्त्री, गीतांजली सुतार, स्नेहलता नाईक आदी महिला आक्रमकपणे आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, आमच्यावर अन्याय केला जात आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही. तसेच रस्त्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीला कागदोपत्री मृत दाखवले असून प्रत्यक्षात ती व्यक्ती जिवंत असल्याचा धक्कादायक आरोपही आंदोलकांनी केला. तसेच प्रशासन हे काही विरोधकांच्या दावणीला बांधले गेले असल्याचे चित्र सध्या दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, आंदोलन सुरू असताना संबंधित कार्यालयातील मुख्य अधिकारी हजर नसल्यामुळे ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलनकर्त्यांची चर्चा केली.










