
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील संतप्त शिवप्रेमींनी एकत्र येत शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे घडलेल्या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन येथील तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. संबंधित दोषींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
चिखली गावात काही गावगुंडांनी दारूच्या नशेत हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला उखडून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. ही कृती महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर घाला घालणारी आहे. स्मारकाचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या शिवप्रेमी भगिनींना विवस्त्र करत मारहाण करण्यात आली, ही बाब अधिकच संतापजनक असल्याचे शिवप्रेमींनी तहसीलदार यांना सांगितले.
ज्या भूमीत स्त्रीला ‘माता’ मानण्याची परंपरा आहे, ज्या स्वराज्यात स्त्रीच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान होते, त्या परंपरेला काळिमा फासणारी ही घटना संपूर्ण समाजाला वेदना देणारी आहे. महिलांवर झालेला अत्याचार हा केवळ कायद्याचा भंग नसून सामाजिक मूल्यांवर केलेला आघात असल्याचीही संतप्त भावना उपस्थित शिवप्रेमींनी व्यक्त केली. अशा विकृत प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास भविष्यात त्या अधिक बळावण्याची भीती आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवप्रेमींनी करत या घटनेचा एकमुखी निषेध केला. प्रशासनाने न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष उदय पास्ते, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सोनू गवस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख मंगेश पाटील, यांसह नगरसेवक संतोष नानचे, वैभव इनामदार, नगरसेविका संध्या प्रसादी, कळणे सरपंच अजित देसाई, शिवशंभु प्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष प्रकाश गवस, मदन राणे, संदेश राणे, दिलखुष माजिक, ॲड. दाजी नाईक, प्रदीप गावडे व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.











