देवगडच्या स. ह. केळकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 06, 2026 16:31 PM
views 22  views

देवगड :  देवगड तालुक्यातील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या १९८९-९० या पदवी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मालवण कोळंब येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाच्या प्रदीर्घ संकटानंतर हे सर्व मित्र-मैत्रिणी प्रथमच एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मैत्रीचा अनोखा सोहळा रंगला. या बॅचला पदवी मिळवून २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २०१६ मध्ये पहिला रौप्यमहोत्सवी मेळावा महाविद्यालयात झाला होता. त्यानंतर मुंबई, कोल्हापूर, पुणे येथेही मेळावे झाले. यावर्षी कोळंब येथे झालेल्या मेळाव्याचे नियोजन मालवणचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे आणि प्रवीण हिंदळेकर यांनी केले होते. त्यांना रमाकांत डगरे, द्विजकांत कोयंडे, जितेंद्र उपरकर, नाना जोईल, अभय कोयंडे आणि हेमंत पिसे यांनी मोलाची साथ दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

मेळाव्यात केवळ गप्पाच नव्हे, तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. यावेळी अरूण घाडीगावकर, संतोष कुळकर्णी, प्रशांत मोंडे, तुकाराम धुरी, सीमा वझे-करंदीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोरंजनाच्या भागात रुजुता कुबल आणि लता चोपडेकर यांनी एकेरी नृत्य सादर केले, तर सर्व मैत्रिणींनी एकत्रित नृत्याचा आनंद लुटला.

गाणी आणि संगीताची मैफल

राजेंद्र सनये, सचिन खवळे आणि अविनाश फणसेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर केली. त्यांना कमलाकर पाटकर आणि सुरेश मेस्त्री यांनी संगीत साथ दिली. तसेच संतोष पांचाळ आणि दिनेश राऊत यांनी गीतांच्या माध्यमातून उपस्थितांचे मनोरंजन केले. संगीता नेने यांनी विविध खेळांचे आयोजन करून वातावरणात चैतन्य निर्माण केले.

भेटवस्तू आणि कृतज्ञता

या निमित्ताने मैत्रिणींसाठी हळदीकुंकू समारंभ पार पडला. विद्याधर (नानू) राणे याने सर्व मित्रांना त्यांचे एकत्रित छायाचित्र असलेला ‘मग’ भेट म्हणून दिला, तर प्रकाश गोगटे यांनी ‘जनता जनार्दन’ हे पुस्तक सर्वांना भेट दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा भिडे-गाडगीळ आणि प्रकाश गोगटे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. जिल्ह्यासह मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुणे येथून आलेले माजी विद्यार्थी या सोहळ्यामुळे भारावून गेले होते. वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.