
दोडामार्ग : जि. प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माटणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार बाबुराव धुरी यांनी पैशाच्या वाटप होत असल्याचा गंभीर आरोप करत हे पैसे वाटप करणाऱ्या गाडयांना आग लावण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. धुरी यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, “मला जिल्हाप्रमुख म्हणून टार्गेट करू नका. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढा. अन्यथा मशालीच्या ज्वाळा भडकतील,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. “मी रात्री-अपरात्री जनतेच्या मदतीला जातो. त्यामुळे मला जनतेची मोठी सहानुभूती मिळत आहे. हीच सहानुभूती पाहून मला पराभूत करण्यासाठी पैशाचे वाटप केले जाणार असल्याची शक्यता आहे. हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
पैशाचे वाटप सुरू झाल्याच्या हालचाली असल्याचे सांगत धुरी यांनी आरोप केला की, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत रात्रीच्या वेळी पैसे वाटप होत असल्याचे वृत्त सोशल मीडियावरून समोर येत आहे. “इथेही आजपासून असे प्रकार सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची विशेष टीम अशा गाड्यांवर लक्ष ठेवून आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी प्रशासनावरही जबाबदारी टाकत सांगितले की, “प्रशासनाने सतर्क राहून यावर लक्ष ठेवावे. अन्यथा पैशाचे वाटप करणाऱ्या गाड्यांना आग लावणार. होणाऱ्या आर्थिक व अन्य नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील.
यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांत जिथे पैशाचे वाटप रोखण्यात आले, तिथे जनतेने बदल घडवून आणल्याचे उदाहरण देत धुरी म्हणाले की, “आता पासून युद्ध आमुचे सुरू आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










