कितीही विरोधक असले विजय आमचाच : दीपक गवस

Edited by: लवू परब
Published on: February 01, 2026 13:24 PM
views 78  views

दोडामार्ग : माटणे मतदार संघात आमच्या समोर कितीही विरोधक असले तरी विजय हा आमचाच आहे हे निश्चित आहे. महायुतिला या मतदार संघातून जनतेचा व मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून मागे राहिल्याचे चित्र आहे. या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून रोजगाराच्या संधी अभावामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात गोव्यावर अवलंबून राहावे लागत आहे, असे मत भाजपचे उमेदवार दीपक गवस यांनी व्यक्त केले.

माटणे मतदारसंघ दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला असून या भागातील मूलभूत प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा, रोजगार, रस्ते आणि इतर विकासकामांबाबत या मतदारसंघाला ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महायुतीच्या माध्यमातून माटणे मतदारसंघात सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करत गवस म्हणाले की, या मतदारसंघात महायुतीला मोठा पाठिंबा मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. महायुतीसमोर कोणताही पर्याय टिकू शकणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.