
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात कोण कितीही आणाभाका केल्या, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी येथील जनता सुज्ञ असून सत्य ओळखते आणि यावेळी माटणेत महायुतीचाच झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास भाजप महायुतीच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद तसेच दोन्ही पंचायत समितींसाठी महायुतीने स्थानिक, प्रामाणिक व प्रत्यक्ष काम करणारे उमेदवार दिले आहेत. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद ठेवणारे हे उमेदवारच निवडून येतील, याबाबत कोणतीही शंका नाही. काहीजण मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असले तरी माटणे मतदारसंघातील जनता सजग असून अशा प्रकारांना बळी पडणार नाही.
राजन म्हापसेकर यांनी कितीही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी यावेळी धनशक्तीला जनशक्ती थारा देणार नाही, असा ठाम दावा करत गवस यांनी महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. आमचा उमेदवार हा सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा, प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणारा असून त्यामुळे माटणेत परिवर्तन निश्चित आहे, असेही त्यांनी नमूद केले.










