
दोडामार्ग : तेरवण - मेढे उन्नैयी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गालगत नदीपात्राजवळ बकऱ्यांचा बळी दिल्याचा संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बकऱ्यांची पाच शिरे, आठ नारळ, पानांचे तीन ढीग व त्यावर ठेवलेली सुपारी आढळून आली असून धड मात्र गायब असल्याने हि घटना अंधश्रद्धेला खतपाती घालणारा स्वरूपाचा असल्याचे बोलले जात आहे.
तेरवण–मेढे उन्नैयी बंधारा तसेच तिलारी धरण परिसर हा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक, कुटुंबीय, तसेच शालेय सहली येत असतात. नदी असल्याने अनेक पर्यटक पोहण्यासाठीही या ठिकाणी येतात. अशा ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती सुरू असताना, दुसरीकडे काही समाजविघातक प्रवृत्तींकडून अशा प्रकारची कृत्ये निदर्शनास येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. संबंधित अघोरी कृत्य करणाऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिलारी खोऱ्यातील ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.










