पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला तिलारी घाटात अपघात

Edited by: लवू परब
Published on: January 16, 2026 14:31 PM
views 139  views

दोडामार्ग : तामिळनाडूमधून गोवा पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा तिलारी घाटात अपघात झाला. घाटातील अवघड वळण आणि तीव्र उताराचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व संरक्षक कठड्यावर आदळले. यात तिघे गंभीर जखमी झाले असून वाहनाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू येथील पर्यटक गोव्याच्या दिशेने प्रवास करत असताना तिलारी घाटात हा अपघात झाला. दरम्यान, कोल्हापुरहून दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसमधील चालक, वाहक व प्रवाशांनी तातडीने मदतकार्य करत जखमी पर्यटकांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित उपचार सुरू केले. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण १५ पर्यटक प्रवास करत होते. त्यामध्ये ९ पुरुष व ६ महिलांचा समावेश होता. अपघातात दर्शनी जे. यांच्या तोंडाला दुखापत झाली असून कल्पना ज्योती (वय ४३, रा. चेन्नई) यांच्या डोक्याला मार बसला आहे. तसेच आरोग्य राज (वय ३६, रा. चेन्नई) यांच्यासह इतर काही पर्यटकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नित्यानंद मसुरकर, डॉ. अतुल, डॉ. तुषार, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांनी जखमींवर तात्काळ उपचार केले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.