
दोडामार्ग : दोडामार्ग वनपरिक्षेत्रात वाढलेल्या वन्यहत्तींच्या उपद्रवामुळे निर्माण होणारा मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हत्ती बाधित गावांमध्ये अत्याधुनिक सायरन अलर्ट सिस्टिम बसविण्यात येत असून, यामुळे नागरिकांना हत्तींच्या हालचालींची वेळेपूर्वी सूचना मिळणार आहे. हाकारी गटातील मजूर व वनकर्मचारी दिवसरात्र वन्यहत्तींचा सातत्याने मागोवा घेत आहेत. हत्ती गावाजवळ येत असल्याची माहिती मिळताच संबंधित गावांमध्ये सायरन वाजवून शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे शक्य होणार असून, संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, ११ जानेवारी २०२६ रोजी पश्चिम बंगाल येथून हत्ती व्यवस्थापनातील तज्ञांची हुल्ला टीम दोडामार्ग तालुक्यात दाखल झाली आहे. हत्ती प्रवण क्षेत्रात या टीमकडून वनकर्मचारी व हाकारी मजुरांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. वन्यहत्तींचा स्वभाव, त्यांच्या हालचालींचे संकेत ओळखणे, तसेच हत्तीना मानवी वस्तीपासून जंगल क्षेत्राकडे कसे वळवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.
विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी विविध साधने व माध्यमांचा वापर करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले जात असून, यामुळे हत्ती नियंत्रण मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे. सायरन अलर्ट सिस्टिममुळे स्थानिक नागरिकांमध्ये वनविभागाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे










