
दोडामार्ग : इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट असलेल्या कोलझर येथील पर्यावरण वाचवण्यासाठी गावाने दिल्ली लॉबीविरुद्ध एल्गार पुकारला. यासाठी सगळ्या गावाने एकत्र येत गावच्या जमिनी विकायच्या नाही आणि असा प्रयत्न करणार्यांना एकजुटीने कायदेशीर मार्गाने धडा शिकवायचा निश्चय केला. यावेळी उपस्थितात तरुणांची संख्या लक्षवेधी होती.
वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णयानुसार केंद्राने अधिसूचना काढून कोलझर हे गाव इकोसेन्सिटीव्ह एरिया म्हणून जाहीर केले आहे. येथे पर्यावरणाला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. याशिवाय येथे २०१८ पासून वृक्षतोड बंदी आदेश लागू आहे. असे असूनही गेल्या आठवड्यात काही ‘दिल्ली लॉबी’शी संबंधित लोकांनी स्थानिक जमिन मालकांना तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेवून मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या ख्रिश्चनवाडीपासून पुढच्या भागात घनदाट जंगलापर्यत अवैधरित्या खनिजयुक्त मातीचे उत्खनन केले आहे. ख्रिश्चनवाडीपासून पलिकडच्या गावातील (शिरवल) न्हयखोलपर्यत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे आणि सुमारे १२ फूट रुंदीचे रस्तासदृश्य उत्खनन केले आहे. या प्रकाराने गावात खळबळ उडाली. या गावाने यापूर्वी खनिज उत्खननाचे वारे असतानाही आपल्या जमिनी दिल्या नव्हत्या. थेट झालेल्या अतिक्रमणाविरोधात लढा पुकारण्यासाठी गाव एकवटला. यासाठी काल (ता. ११) गावच्या मंदिरात बैठक झाली. यावेळी देवस्थान मानकरी, स्थानिक याबरोबरच तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी अवैधरीत्या झालेल्या उत्खननाचा निषेध करण्यात आला. संबंधितानी यातून हजारो टन खनिजयुक्त माती काढून बहुसंख्य मातीसाठा येथून वाहनाद्वारे चोरुन नेऊन अन्य ठिकाणी साठवला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याबाबत ज्यांच्या जमिनीतून हे उत्खनन केले गेले त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी विचारण्यात आली नाही किंवा त्यांना याबाबत कसलीही कल्पना दिली नाही. या डोंगरात जायला कोणत्याही प्रकारचा रस्ता अस्तित्वात नव्हता आणि सध्या नाही.डोंगरात रस्ता झाला तर तेथील समृद्ध पर्यावरणात मानवी हस्तक्षेप वाढेल आणि तेथील जैवविविधतेला धोका पोहोचेल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. या जंगलातून पट्टेरी वाघासह अन्नसाखळीतील अनेक दुर्मिळ प्राणी ,पक्षी ,इतर सजीव यांचा अधिवास आहे . तो कायम राहावा यासाठी डोंगरात जायला रस्ता न करता स्थानिक केवळ रानवाटांचा वापर करत आले आहेत.असे असूनही या गावाबाहेरील लोकांनी स्थानिकांना, जमीन मालकांना अंधारात ठेवून हे कृत्य केले आहे.या उत्खनन केलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडे होती. यातील बहुसंख्य झाडे जुनी आणि पूर्ण वाढ झालेली होती. याचा येथील जैवविविधतेबरोबरच अन्नसाखळी समृध्द करण्यामध्ये मोठा वाटा होता. उत्खनन करताना ही झाडे तोडून मुळासकट येथून गायब करण्यात आली आहेत. वृक्षतोडीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
डोंगरातील हे उत्खनन व वृक्षतोड यामुळे येथील पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. दिल्लीला लॉबीशी संबंधित काहींनी येथील जमीन खरेदीचे व्यवहार सुरू केले आहेत. त्यांनीच हा प्रकार केल्याचा संशय यावेळी उपस्थियांनी व्यक्त केला. असेच प्रकार सुरू राहिल्यास जंगलात मानवी हस्तक्षेप वाढून जैवविविधता धोक्यात येण्याबरोबरच वाघाचा कॉरिडॉर संकटात सापडणार आहे. असे प्रकार आमच्या गावात खपवून घेणार नसल्याचा निर्धार यावेळी उपस्थितानी केला. वन विभागाने या संदर्भात पावले उचलून हे अतिक्रमण तसेच वृक्षतोड करणार्यांना शोधून काढावे. त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा आंदोलनात्मक आणि कायदेशीर मार्गाने पावले उचलावी लागतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शामराव देसाई, आपा देसाई, गुरूदास देसाई, शरद देसाई, पी. पी. देसाई, दीपक देसाई, मुरारी मुंगी, सुदेश देसाई, उल्हास देसाई, महादेव देसाई, दिलीप देसाई, दौलत देसाई, राजाराम देसाई, आनंद देसाई, सत्यवान देसाई, अमर सावंत, देवेंद्र देसाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
जमिनी न विकण्याची ग्रामदैवतेसमोर प्रतिज्ञा
ग्रामस्थांनी एकत्र येत गावचे ग्रामदैवत श्री. देवी माऊलीकडे नारळ ठेवून पुर्वजांचा ठेवा असलेल्या गावच्या जमिनी रक्ताच्या नात्याबाहेर विकणार नाही अशी शपथ घेतली. गावाची जैवविविधता, येथील पर्यावरण आणि त्यावर आधारीत येथील कृषी व्यवस्था अबाधीत रहावी असे साकडे घालण्याबरोबरच अशा गावहिताविरोधातील गोष्टींना पाठबळ देणार्यांना कधीच साथ न देण्याचा निश्चय करण्यात आला.
व्यवहार न करण्याची जमिन दलालांना विनंती
परिसरात जमिन व्यवहार करणार्यांना ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जावून गावासमोर येण्याची विनंती केली. यानुसार काल सायंकाळी पुन्हा गाव बैठक झाली. यावेळी जमिन व्यवहार करणार्यांना आम्हाला गावातील हा ठेवा विकायचा नसल्याने अशा गावच्या व्यवहारात आपण पडू नये अशी विनंती करण्यात आली. उपस्थित असलेल्यांनी ते मान्य केले. जवळच्या सासोली गावामध्ये जमिन व्यवहारात दोडामार्ग महसूल विभागांने भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले होते. कोलझरबाबतीत असे काही झाल्यास कायदेशीर मार्गाबरोबरच आंदोलनात्मक लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
महसूलच्या पथकाकडून उत्खननाची मोजमापे
ग्रामस्थांनी या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवल्याचे समजताच आज दोडामार्ग महसूल विभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी घटणास्थळी झालेल्या उत्खननाची मोजमापे तसेच इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली. यावेळीही मोठ्या संख्येने ग्रामस्थ, तरुण याठिकाणी जमले. जमिन मालकांना अंधारात ठेवून हे कृत्य करणार्यांवर तातडीने कारवाई करा. येथे आधी कोणताही रस्ता अस्तित्वात नसताना केलेली खोदाई आणि वृक्षतोड याला जबाबदार असणार्यांना शोधून काढा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.










