सांगेली माडखोल नदीपात्र गाळ काढण्याच्या नावाखाली उध्वस्त होतंय

वाळू माफियांनी जमविली करोडोंची माया | पर्यावरणाचे गंभीर प्रश्न होणार निर्माण | माडखोल ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: January 12, 2026 19:28 PM
views 84  views

सावंतवाडी : आर्थिक हव्यासापोटी स्वतःचे खिसे भरण्यासाठी सांगेली, माडखोल व अन्य नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली नदीपात्रातील अनमोल खनिजे, वाळू उपसा केला जातो. तसेच तो वाळू माफियांच्या घशात कवडीमोल दराने घालून करोडो रुपयांची माया जमविण्यात येते. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, तहसील प्रशासन, जिल्हा खनिकर्म विभाग कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग को. प्र. अलोरे, मंडळ अधिकारी, आंबोली आणि तलाठी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी. अन्यथा, 26 जानेवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माडखोल ग्रामस्थांनी दिला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी नदी/खाडीपात्रातील गाळ व गाळी बेटे निष्कासन करण्यासाठी कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरस्थिती निर्माण होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाणांची निश्चिती करून गाळ काढण्यासाठीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर हा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवून नंतर गाळ काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार बैठक होऊन तेरेखोल नदीपात्रातील गाळ कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, को. प्र. अलोरे यांच्याकडून पूरनियंत्रण अंतर्गत मशिनरीद्वारा काढण्याचे काम सुरू करण्यात आले.  गाळ काढताना व त्याची वाहतूक करताना तेरेखोल नदीपात्रातील वाळू व अन्य गौणखनिज यांची वाहतूक होते का ? हे पाहण्याची जबाबदारी सावंतवाडी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे देण्यात आली होती. जिल्ह्यातील तेरेखोल नदी ही सावंतवाडी तालुक्यातील माडखोल, सांगेली, कलंबिस्त, ओवळीये, सातुळी बावळाट, ओटवणे, बांदा या गावांमधून प्रवाहित होते. सर्व गावांमध्ये गाळ उपसा करण्याच्या नावाखाली लाखो ब्रास वाळू उत्खनन करून नाममात्र रॉयल्टी भरणा करून घेत स्थानिक वाळू माफियांच्या घशात घतली जात आहे. यातून अधिकारी प्रतिवर्षी लाखो रुपयांची माया गोळा करत आहेत. नदीपात्रातून काढलेली वाळूनजीक गोवा राज्यात वाहतूक केली जात आहे. वाळू माफियांना नदीपात्रातील वाळू कमी पडत असल्याने नदीपात्रातील दगडधोंडे  उत्खनन करून त्यासाठी डस्ट बनविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सातुळी-बावळाट रोडवर यंत्रणा उभारण्यात आली आहे. गाळ उपसा होत असताना त्यावर नियंत्रण ठेवणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना ते कधीही नदीपात्राकडे फिरकले नाहीत. याबाबत वारंवार प्रशासनान लक्ष वेधूनही कारवाई न झाल्याने अधिक जोमाने नदीपात्रातील वाळू आणि दगड उत्खनन केले जात आहे. हा प्रकाश म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती लूट आहे. आता स्थानिक पातळीवर न्याय मिळेल, अशी शक्यता वाटत नाही.

या प्रकरणात सक्षम यंत्रणेद्वारा प्रजासत्ताक दिनापूर्वी चौकशी करावी. तेरेखोल नदीपात्रातील वर नमूद सर्व गावातील नदीपात्राशेजारी ढीग करून ठेवलेल्या ढिगार्‍यांची तसेच क्रशरची चौकशी करावी. दोषी अधिकाऱयांवर तात्काळ निलंबनी कारवाई करावी. आपल्या स्तरावर जिल्ह्याबाहेरील स्वतंत्र अधिकारी नेमून या सर्व प्रकाराची चौकशी करावी. अन्यथा प्रजासत्ताकदिनी उपोषण केले जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर विशाल विनोद राऊळ, रोहित रवी गोताड, विजय सावळाराम राऊळ, श्रीकांत शशिमोहन खोत, संतोष विठ्ठल राणे, अरविंद नारायण गावडे, अविनाश अंकुश राऊळ, स्वप्निल शिवाजी सावंत, विजय सावळाराम राऊळ आदींच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांनाही देण्यात आल्या आहेत.