
मालवण : चिरेखाण मजुरांच्या अस्वच्छतेमुळे पाण्याचा स्रोत दूषित होत असल्याची तक्रार करत ग्रामपंचायत बुधवळे कुडोपी व ग्रामस्थांच्या वतीने मालवण तहसील कार्यालय समोर एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान या ठिकाणी स्वच्छता, सामाजिक अंतर व सर्व नियमांचे पालन करावे. शौचालय व्यवस्था करावी. असे पत्र तहसील प्रशासनाने खाणमालकांना देत. 15 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी असे स्पष्ट केले आहे.
यावेळी सरपंच संतोष पानवलकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, सदस्य प्रशांत पडवळ, भक्ती जंगले, राजू घागरे, गुरूदास मयेकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत बुधवळे कुडोपी यांनी तहसील प्रशासनास दिलेल्या पत्रात म्हटले आहे, बुधवळे कुडोपी ग्रामपंचायत हद्दीत चिरेखाण व्यवसाय सुरु असून तेथील मजुरांची शौचालयाची व्यवस्था नसल्याणे उघड्यावर शोचालयास बसतात. सदरिल खाण मालकांना पत्र देऊनच प्रत्यक्ष भेटून वारंवार सुचना दिलेल्या आहेत परंतु आजपर्यंत मजुरांची शौचालयाची व्यवस्था केलेली नाही. बुधवळे कुडोपी हे गाव खोलभागात असून लेथे नैसर्गिक झरे असल्याने ग्रामस्थ हे पाणी पिण्यासाठी वापर करतात. परंतु खाण कामगार हे उघड्यावर शौचालयास बसत असल्याने येणारे पाणी हे नैसर्गिक झ-यांना मिळते व पाणी दुषित होते. दुषित पाण्यामुळे रोगराई होण्याचा संभव नाकारता येत नाही. तसेच बुधवळे कुडोपी ग्रामपंचायत हि सन २००८-२००९ मध्ये हागदारी मुक्त गावं म्हणून घोषित झालेला आहे. असे असताना खाण मालक यांनी शौचालयाची व्यवस्था करण्याचाबत आपल्याकडून योग्य तो कार्यवाही करण्यात यावी. नपेक्षा उत्खनन करण्याबाबत दिलेले परवाने रद्द करण्यात यावे. असे पत्र दिले.
या प्रश्नी तहसील प्रशासनाने खाणमालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, आपणास देण्यात आलेल्या खाणपरवाना आदेशातील विवरणपत्र-अ मधील क्र. २६ मध्ये संबंधित ठिकाणी असलेल्या मजुरांची राहण्याची तसेच काम करतांना त्यांच्या सामाजिक व सुरक्षित अंतर ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी खाणपट्टाधारक परवानाधाक यांची राहील. तसेच याबाबत स्वच्छता, सामाजिक अंतर चे सर्व नियम पाळण्यात यावेत असे नमूद केलेले आहे. सरपंच ग्रामपंचायत बुधवळे-कुडोपी यांनी आपण चिरेखाण परवानाधारक या नियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार नमूद केलेली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने उपरोक्त नियमांनुसार १५ दिवसांच्या आत उचित कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी अहवाल कार्यालयास व ग्रामपंचायत कार्यालयास सादर करावा. सदर कार्यवाहीस विलंब झाल्यास खाण परवाना आदेशातील नियमांनुसार आपलेविरुध्द सक्त कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी. असे म्हटले आहे.










