
सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाढलेली झाडी, झुडपे तसेच ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग तात्काळ हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय संकुलातील नूतनीकरणाच्या कामाची तसेच संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान कार्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले असून मोठ्या प्रमाणावर वाढलेली झाडी व झुडपे दिसून आली. काही ठिकाणी इमारती झुडपांआड लपल्याचेही निदर्शनास आले. या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी वाढलेली झाडी तात्काळ काढून टाकण्याचे व साचलेला कचरा एकत्रितपणे हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय संकुलातील इमारत नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे कार्यालय परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुशोभित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.










